Advertisement

दिवाळीत भेटीगाठी टाळण्याचं महापालिकेचं आवाहन

बाजारात कंदिल, पणत्या, रांगोळ्या, फराळ, यांसारख्या अनेक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

दिवाळीत भेटीगाठी टाळण्याचं महापालिकेचं आवाहन
SHARES

अवघ्या ५ दिवसांवर दिवाळी (diwali) येऊन ठेपली असून, खरेदीची लगबग सुरू झाली आहे. बाजारात कंदिल, पणत्या, रांगोळ्या, फराळ, यांसारख्या अनेक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. दिवाळी हा उत्साहाचं सण असून, सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद दिसतो. परंतु, यंदा कोरोनामुळं सर्वांच्याच आनंदात विर्जण पडल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. कारण दिवाळीनंतर मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्यामुळे महापालिकेनं (bmc) आतापासूनच सावधगिरीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

दिवाळीच्या काळात नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, घराबाहेर पडताना मास्क लावावा, तसेच भेटीगाठी शक्यतो टाळण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे. कोरोनामुळे (coronavirus) यंदा सर्वच सण साजरे करण्यावर निर्बंध आले होते. त्यामुळे दिवाळीच्या सणावरही बंधने येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे फटाक्यांच्या धुरामुळे वातावरण प्रदूषित झाल्यामुळे श्वसनास त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडण्यावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य सरकारच्या नियमावलीकडे पालिकेचे लक्ष लागले आहे.

दिवाळीनिमित्त अनेक लोक पहाटे मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असतात, नातेवाईकांकडे जातात, सार्वजनिक पूजा, स्नेहसंमेलने आयोजित करतात, तर अनेक ठिकाणी लोक एकत्र येऊन फटाके फोडतात. मात्र कोरोनामुळं सार्वजनिक ठिकाणी फाटक्या न फोडण्याचा आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. अनेक विभाग कार्यालयांमध्ये गृहनिर्माण सोसायट्या स्नेहसंमेलन साजरे करण्याबाबत विचारणा करीत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता जवळपास शिथिल करण्यात आला आहे. लोकांचा सार्वजनिक क्षेत्रातील वावर वाढलेला आहे. मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. हात सतत धुणे किंवा सॅनिटायझर लावणे तसेच सामाजिक अंतर पाळणे हे तीन मुख्य नियम पाळण्याचे सतत आवाहन केले जात आहे. या ३ गोष्टीच्या नियमांचं पालन दिवाळीच्या सणातही लोकांनी करावं. 

गणपती सणानंतर ज्या पद्धतीने रुग्णसंख्या वाढू लागली तशीच परिस्थिती दिवाळीनंतर उद्भवल्यास पालिकेची तयारी असल्याची माहिती समोर येत आहे. रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळं काही कोरोना उपचार केंद्रे बंद करण्यात आलेली असली तरी ती तातडीने सुरू करता येणार असल्याचीही माहिती मिळते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा