Advertisement

यंदाच्या गणेशोत्सवात शाडूच्या मूर्तींना प्राधान्य

कोरोनामुळं यंदाच्या गणेशोत्सवात शाडुच्या मूर्तींना अधिक प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात शाडूच्या मूर्तींना प्राधान्य
SHARES

कोरोना व्हायरसमुळं मुंबईसह राज्यातील सुविधांना ब्रेक लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळं राज्यातील सणांवर गदा येण्याची शक्यता आहे. अगामी काळात राज्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईला प्रमुख मानलं जातं. परंतु, याच मुंबईला कोरोनानं घेरल्यामुळं गणेशोत्सावर संकट येण्याची शक्यता आहे. तसंच, सार्वजनिक मूर्तींबाबत 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतल्यानंतर बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघाने घरातच शक्य तितक्या शाडूच्या मूर्ती तयार करण्याच्या सूचना मूर्तिकारांना दिल्या आहेत.

आगामी काळात मुंबईत गणेशोत्सव साजरा होणारच याबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती ठाम आहे. परंतु, अगदी साधेपणानं साजरा करण्याबाबत समन्वय समितीनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या शाडूच्या मूर्ती केवळ ११, १५, १८, २१ इंच इतक्या उंचीच्या असतील असंही संघानं मूर्तिकारांना पाठवलेल्या पत्रात म्हटल्याचं समजतं.

कोरोनामुळं यंदाच्या गणेशोत्सवात शाडुच्या मूर्तींना अधिक प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन असल्यामुळं मूर्ती बनविण्याच्या कामाला अद्याप सुरूवात झालेली नाही. तसंच, शासनाचा आदेश येईपर्यंत सार्वजनिक मूर्तींची ऑर्डर घेतली जाणार नाही हे देखील यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळं मूर्तीकारांवर संकट येण्याची शक्यता आहे. अशातच, भाविकांना किमान घरगुती गणपतींचे पूजन करणे शक्य व्हावे यासाठी संचारबंदीच्या काळात घरात बसूनच मूर्ती घडवण्यास सुरुवात करण्याच्या सूचना मूर्तिकारांना देण्यात आल्या आहेत.

शाडूच्या मूर्तीसाठी लागणार कच्चा माल गुजरातहून येतो. मात्र, सध्या दळणवळण ठप्प असल्याने हा माल मूर्तिकारांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने गुजरातहून कच्चा माल (शाडू माती) आणण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा मूर्तिकार संघाने व्यक्त केली आहे. तसेच प्रत्येक मूर्तिकार आपापल्या घरात सुरक्षित वावर राखून तसेच सर्व अटीशर्थींचे पालन करतच मूर्ती घडवण्याचे काम करण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा