Advertisement

गणेशोत्सव २०१९ : १२७ वर्षांपासून 'इथं' साधेपणानं साजरा होतो गणेशोत्सव

गिरगावातील केशवजी नाईक चाळ. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या उत्सवाचा आदर्श ठेवून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा केशवजी नाईक चाळीनं जोपासली आहे.

गणेशोत्सव २०१९ : १२७ वर्षांपासून 'इथं' साधेपणानं साजरा होतो गणेशोत्सव
SHARES

हल्लीच्या उत्सवांना एकप्रकारे 'इव्हेंट'चं स्वरूप आलं आहे. मग तो गणेशोत्सव असो, गुढी पाडवा असो किंवा नवरात्रौत्सव. सण कुठलाही असला तरी डिजेचा दणदणाट हा असतोच. त्यात भर म्हणून नृत्याचा धिंगाणा, मंडळांमध्ये वाढलेली स्पर्धा, उंच मूर्ती, भाविकांची गर्दी आणि ग्लॅमरचा तडका, हे चित्र दरवर्षी गणेशोत्सवात पाहायला मिळतं.  मात्र या सगळ्यात आजही सण-उत्सवांचं महत्त्व जाणून पारंपरिक पद्धतीनं, साधेपणानं आणि मूळ उद्देश जपत गणेशोत्सव साजरा करणारी अनेक सार्वजनिक मंडळं आहेत. त्यापैकीच एक आहे गिरगावातील केशवजी नाईक चाळ. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या उत्सवाचा आदर्श ठेवून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा केशवजी नाईक चाळीनं जोपासली आहे.


समाजात एकी निर्माण व्हावी या उद्देशानं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरे व्हावेत यासाठी पुढाकार घेतला. टिळकांच्या आदेशाचं पालन करत १८९३ साली केशवजी नाईक चाळीत सार्वजनिक गणपती उत्सवाची सुरुवात झाली. यावर्षी केशवजी नाईक चाळीतील मंडळाला १२७ वर्ष पूर्ण झाली.


साधेपणा हेच उत्सवाचं वैशिष्ट्य

१२७ वर्ष उलटल्यानंतरही या मंडळानं गणेशोत्सवाच्या मूळ उद्देशाची कास सोडलेली नाही. डिजेचा दणदणाट, प्रसिद्धीच्या वलयात आणि गगनाला भिडलेल्या मूर्तींच्या उंचीत या मंडळानं आजही साधेपणा जपलेला आहे. हे मंडळ गेल्या १२७ वर्षांपासून एकाच आकाराची म्हणजे दोन फुटांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहे. गणपतीचं आगमन आणि विसर्जन पालखीतून केलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चाळीतील सर्व रहिवासी मिरवणुकीत अनवाणीच सहभागी होतात.


१० दिवस बाप्पा आमच्या चाळीत विराजमान होतो. पारंपरिक पद्धतीने आम्ही गणेशोत्सव साजरा करतो. ना डिजेचा दणदणाट, ना कोणता दिखाऊपणा. प्रवचन, व्याखानमाला, किर्तन यांचे आयोजन केलं जातं. यावर्षी मुलांसाठी स्पेशल कोणता कार्यक्रम ठेवला नाही. पण संध्याकाळी बुद्धीला चालना देणारे छोटे खेळ आयोजित केले आहेत.

-विश्वास सातपुते, विश्वस्त, एसजीएस


टिळकांची चाळीतील पहिली भेट

लोकमान्य टिळक १९०१ साली गणेशोत्सवादरम्यान मुंबईत एका सभेसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी केशवजी चाळीतील बाप्पाला भेट दिली होती. फक्त भेटच नाही, तर त्यांच्या व्याख्यानाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. लोकमान्य टिळकांच्या केशवजी नाईक भेटीचा वृत्तांत केसरीमध्ये देखील प्रसिद्ध झाला होता. ‘मुंबईचा गणपती उत्सव’ या नावानं या भेटीचं वर्णन केसरीमध्ये प्रकाशित झालं होतं.

१९९२ साली या मंडळानं शताब्दी वर्ष साजरं केलं. पुण्यातल्या एका अभिनेत्यानं लोकमान्य टिळकांची हुबेहुब वेशभूषा केली होती. लोकमान्य टिळकांसारखं भाषणही त्यांनी दिलं होतं.

पुण्यातल्या त्या अभिनेत्यानं अगदी हुबेहुब टिळकांची व्यक्तिरेखा साकारली होती. आम्ही सर्व मंत्रमुग्ध झालो होतो. १९०१ साली टिळक घोडागाडीतून आले होते. तसाच प्रवेश या अभिनेत्यानं केला. फक्त एवढंच नाही, तर त्याच्या बाजूला इतर कलाकारही होते ज्यांनी ब्रिटिशांची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यावेळी या कलाकाराचं खूप कौतुकही झालं होतं.

- कुसुम गोगटे, सदस्य, एसजीएस


केशवजी नाईक चाळीतल्या बाप्पाला अनेक राजकीय नेत्यांनी आणि कलाकारांनी भेट दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, राम शेवाळकर यांनी इथे आयोजित व्याख्यानात मार्गदर्शनही केलं आहे.

साधेपणा आणि परंपरा जपूनही गणेशोत्सव साजरा करता येऊ शकतो, हे केशवजी नाईक चाळीतल्या सदस्यांनी दाखवून दिलं. यांचा आदर्श इतर मंडळांनी घेतला तर उत्सवांमधील आत्मा जिवंत राहील, हे नक्की.हेही वाचा

गणेशोत्सव २०१९: स्वामींच्या रुपातला सह्याद्री क्रीडा मंडळाचा बाप्पा

गणेशोत्सव २०१९ : 'जंगलबूक'चा आकर्षक देखावा पाहण्यासाठी 'या' मंडळाला भेट द्या


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा