Advertisement

गणेशोत्सव २०१९ : यावर्षी मुंबईतल्या या '७' गणपती मंदिरांना भेट द्या

गणपती मंदिर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर प्रभादेवीतील सिद्धीविनायक मंदिर येतं. पण या व्यतिरिक्त देखील मुंबईत अनेक गणेश मंदिरं आहेत. तुम्हाला जर प्रभादेवीच्या मंदिरात येणं शक्य नसेल तर आम्ही दिलेल्या मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन करू शकता.

गणेशोत्सव २०१९ : यावर्षी मुंबईतल्या या '७' गणपती मंदिरांना भेट द्या
SHARES

‘बुद्धीचा अधिष्ठाता’ असलेल्या गणेशाची मंदिरे महाराष्ट्रात जागोजागी आढळतात. अष्टविनायक, टिटवाळा, गणपतीपुळे, वाईचा ढोल्या गणपती तर प्रसिद्ध आहेत. मुंबईतही गणपतीची अनेक मंदिरे आहेत. प्रभादेवी इथलं सिद्धिविनायक मंदिर, बोरिवलीतील वझिऱ्याचा गणपती, गिरगावचा फडके गणपती मंदिर आदी मंदिरे प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला मुंबईतल्या प्रसिद्ध गणपती मंदिरांची भेट घडवून देणार आहोत.


१) सिद्धिविनायक, प्रभादेवी

प्रभादेवीचा सिद्धिविनायक म्हणजे मुंबई आणि मुंबईबाहेरीलही गणेश भक्तांचं अतिशय श्रद्धेचं स्थान. या मंदिरातील उजव्या सोंडेची मूर्ती चतुर्भुज असून वरच्या दोन हातात अंकुश आणि कमळ, खालच्या हातात जपमाळ आणि मोदक आहे. या मंदिरातील मूळ मूर्ती काळ्या दगडाची असून ती रंगवण्यात आली आहे. पूर्वी इथं पुरातन बांधणीचं मंदिर होतं. आता मात्र सहा मजली आकर्षक इमारतीसारखं मंदिर उभारण्यात आलं आहे.


कुठे?

एस.के. बोले मार्ग, प्रभादेवी

कसं जायचं?

दादर आणि परळ स्थानकाहून टॅक्सी किंवा बसनं या मंदिरापर्यंत जाता येतं. 


२) उद्यान गणेश, दादर

उद्यान गणेश मंदिराची स्थापना १९७० मध्ये करण्यात आली होती. या मंदिरातील मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे १९६६ मध्ये एका व्यक्तीला या ठिकाणी छोटी गणपतीची मूर्ती सापडली होती. ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे. रीतसर पूजा करून मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. त्यानंतर १९७० मध्ये छोटसं मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलं. मूर्ती उद्यानात सापडली असल्यामुळं या मंदिराला उद्यान गणेश मंदिर असं नाव देण्यात आलं. २०१२ साली मंदिराची पुर्नबांधणी करण्यात आली.


कुठे?

वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क मैदान, दादर

कसं जायचं?

दादर स्टेशनपासून शिवाजी पार्क चालत येऊ शकता. अवघ्या २०-२५ मिनिटांवर आहे. 


३) पार्लेश्वर मंदिर, विलेपार्ले

विलेपार्ले स्थानकापासून काही मिनिटं अंतरावर पार्लेकरांचं श्रद्धास्थान असलेलं पार्लेश्वर मंदिर आहे. मूळ मंदिर शिवाचं असलं तरी मंदिराच्या उजव्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे. मंदिर फारसं जुनं नाही. अवघ्या २५ वर्षांपूर्वीचं मंदिर आहे. मात्र विलेपार्ले परिसरात या मंदिराला खूप महत्त्व आहे. मंदिरातील गणेशमूर्ती पंचधातूची आहे. मूर्तीवर चांदीचं छत्र आहे. 


कुठे?

पार्लेश्वर मंदिर, महात्मा गांधी रोड, नवपाडा, विले पार्ले

कसं जायचं?

मंदिरात जाण्यासाठी विलेपार्ले स्थानकावरून चालत वा रिक्षाने जाता येते.


४) वांच्छा सिद्धिविनायक मंदिर, अंधेरी

मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या पाठारे प्रभूंचं हे दैवत. मंदिर प्रशस्त तर आहेच. याशिवाय मंदिरात संगमरवरी रेखीव गणेशमूर्ती आहे. सोन्याचा मुकुट आणि सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेल्या या गणेशाच्या दर्शनासाठी दर मंगळवारी या मंदिरात भाविकांची गर्दी होते. १९२७ मध्ये या मंदिराची उभारणी करण्यात आली. 


वांच्छा या शब्दाचा अर्थ इच्छापूर्ती असल्यानं ‘इच्छापूर्ती करणारा गणेश’ म्हणून वांच्छा सिद्धिविनायक असं संबोधलं जातं. या मंदिराचा १९९७ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला असून पाच मजली इमारतीची उभारणी करण्यात आली. या मंदिरात गणेशासह शिवशंकर, दत्तगुरू, मारुती आणि महालक्ष्मीचीही छोटी मंदिरं आहेत. 

कसं जायचं?

अंधेरी स्थानकाजवळच हे मंदिर आहे.


५) गणेश मंदिर, जोगेश्वरी लेणी

मुंबईत मागाठाणे, कान्हेरी, मंडपेश्वर, जोगेश्वरी आदी लेण्या आहेत. यापैकीच एका लेणीमध्ये दणेशाचं मंदिर आहे. जोगेश्वरी लेणीमध्ये हे गणेशाचं मंदिर आहे. गुहेत असलेलं हे मंदिर शिल्प सौंदर्याचा उत्तम नमुना म्हणून संबोधलं तर वावगं ठरणार नाही. गणेशची मूर्ती दगडात कोरलेली आहे. त्यावर शेंदुराचा लेप आहे. गुहेच्या समोर दोन खांब असून त्यावर कोरीवकाम आहे. जोगेश्वरी हे लेणी ही शैव लेणी असून लेण्याच्या सुरुवातीलाच गणेश मंदिर आहे. ही दक्षिणाभिमुख मूर्ती आहे.


कसं जायचं?

जोगेश्वरी स्थानकापासून रिक्षाने किंवा बसने येथे जाता येते.


६) संकल्पसिद्धी गणेश मंदिर, गोरेगाव

१७ जुलै १९६१ साली छोटी मूर्ती बसवून संकल्पसिद्धी गणेश मंदिराची स्थापना करण्यात आली. त्यावेळी रामचंद्र भट्ट यांच्या हस्ते गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. १९८० मध्ये गणपती मंदिराचं बांधकाम करण्यात आलं. तर फेब्रुवारी १९८४ मध्ये माघी गणेश चतुर्थीनंतर येणाऱ्या संकष्टीला मंदिरात काळ्या रंगाच्या गणपतीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून या गणपतीला मुंबईतील 'काळा गणपती' म्हणून ओळखलं जातं.


कसं जायचं?

गोरेगाव स्टेशनवरून मोतीलाल नगरला जायचं. मोतीलाल नगर १ इथं या गणपतीचं मंदिर आहे. 


७) गणेश मंदिर, बोरीवली

बोरीवली पश्चिमेकडील वझीरा नाका इथलं गणेश मंदिर शेकडो वर्षांपूर्वीचं आहे. पूर्वी केवळ कोळी, भंडारी आणि स्थानिक ग्रामस्थच या मंदिरात दर्शनासाठी येत होते. आता मात्र या मंदिराचे महत्त्व वाढल्यानं मुंबईतील अनेक भाविक गणेश दर्शनासाठी इथं येतात. या ठिकाणी पाच मंदिरं आहेत. गणेशाची मूर्ती उत्तर दिशेला असून बाजूला शितला देवीची मूर्ती आहे. त्याशिवाय मारुती आणि स्थानिक ग्रामदेवता आलजी देव यांचीही मंदिरं आहेत.


कसं जायचं?

बोरीवली स्थानकातून (पश्चिम) पायी किंवा रिक्षाने वझिरा नाका येथे जाता येते.हेही वाचा -

गणेशोत्सव २൦१९ : भारताबाहेरही गणपतीची पौराणिक रूपं
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा