Advertisement

यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट

यंदाही गणेशोत्सव मंडळ व मूर्तिकार यांच्या वाटेला निराशाच येत आहे.

यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट
SHARES

गतवर्षी आलेल्या कोरोना (coronavirus) या जीवघेण्या व्हायरसमुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या व्हायरसची तीव्रता पाहता सर्व सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले. राज्य सरकारच्या (state government) नियमाखाली नागरिकांना आपला गणेशोत्सव साजरा करावा लागला. मात्र यंदाही परिस्थिती फारशी बदलली नाही. कोरोनाचं (covid 19) सावट अजूनही मुंबईसह राज्यावर आहेच. त्यामुळं यंदाही गणेशोत्सव मंडळ व मूर्तिकार यांच्या वाटेला निराशाच येत आहे.

मुंबईची ओळख असलेल्या उंच गणेशमूर्तींच्या प्रघातात कोरोनामुळे खंड पडला, परंतु यंदाच्या वर्षी ‘सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू’ असा पवित्रा मंडळांनी घेतला आहे. सरकारी नियमावलीला दिरंगाई होत असल्याने मंडळांनी मुख्यमंत्र्यांसह अन्य राजकीय नेत्यांशी मूर्तीच्या उंचीबाबत पत्रव्यवहार सुरू केला आहे. गतवर्षी नियमांची अंमलबजावणी केली. अनेक ठिकाणी उत्सवात खंड पडला, पण यंदा मात्र सरकारनं मंडळांची भूमिका समजून घ्यावी असं अनेक मंडळांचं मत आहे.

'मूर्तीची उंची कमी करणे योग्य नाही. एक वर्ष सर्वांनीच सहकार्य केले, पण प्रश्न श्रद्धेचा आहे. लोकांना ऑनलाइन दर्शन देऊ. आगमन-विसर्जनात केवळ निवडक कार्यकर्ते असतील. पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी आहे. फक्त यंदा उंच मूर्तीला परवानगी द्यावी' अशी मागणी अनेक गणेशोत्सव मंडळ करत आहेत. शिवाय याबाबत त्यांनी पत्रही मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.

गेल्या वर्षीच्या नुकसानीनंतर अनेक मूर्तिकारांनी कारखाने बंद केले. ज्या व्यवसायावर वर्षभर गुजराण करायचा, तो अवघा १० टक्क्यांवर आला तर मूर्तिकारांचे जगणे कठीण होईल. त्यामुळे यंदा सरकारनं विचार करून उंचीबाबत सकारात्मकता दाखवावी, असं मूर्तिकारांचं मत आहे.

सध्या कोरोनास्थिती नियंत्रणात असल्यानं उंच मूर्तींना पाठिंबा द्यावा, अशी विनंती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने राज्य सरकारला केली आहे. यंदाच्या उत्सवात काय नियम असावेत याबाबतचे पत्र त्यांनी सरकारला दिले आहे. त्यानुसार उंचीची मर्यादा नसावी, पीओपीच्या निर्णयाबाबत तातडीने निर्णय घेणे, चौपाटी विसर्जनासाठी खुल्या कराव्यात, अशा प्रमुख मागण्या आहेत. तसेच मंडळांचा कल जाणून घेण्यासाठीही समितीने पुढाकार घेतला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा