Advertisement

गणेशोत्सव २०१९ : मुंबईत नवीन आहात? मग या '५' प्रसिद्ध गणेश मंडळांना नक्की भेट द्या

सार्वजनिक मंडळांनी केलेली आरास, सजावट पाहण्यासाठी देशी-विदेशी पाहुण्यांची पावलंही मुंबईकडे वळतात. मुंबईत येणाऱ्या याच पाहुण्यांसाठी आम्ही काही प्रसिद्ध सार्वजनिक मंडळांची माहिती तुम्हाला देणार आहोत.

गणेशोत्सव २०१९ :  मुंबईत नवीन आहात? मग या '५' प्रसिद्ध गणेश मंडळांना नक्की भेट द्या
SHARES

गणेशोत्सव हा आता केवळ मुंबईकरांचा सण राहिलेला नाही, तर त्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वलय प्राप्त झालंय. सार्वजनिक मंडळांनी केलेली आरास, सजावट पाहण्यासाठी देशी-विदेशी पाहुण्यांची पावलंही मुंबईकडे वळतात. मुंबईत येणाऱ्या याच पाहुण्यांसाठी आम्ही काही प्रसिद्ध सार्वजनिक मंडळांची माहिती तुम्हाला देणार आहोत. तसंच ते या मंडळांपर्यंत कसे जाऊ शकतात, हे सांगणार आहोत.


) 'गणेशगल्ली’चा राजा

कधीकाळी गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबाग-परळच्या कष्टकरी, गिरणी कामगारांनी १९२८ मध्ये गणेशगल्लीत गणपती बसवायला सुरूवात केली. १९७७ साली सर्वप्रथम २२ फुटांची उंच गणेशमूर्ती या ठिकाणी बसवली गेली आणि ती पाहण्यासाठी भाविकांची रीघ लागली. तेव्हापासून एकापेक्षा एक आकर्षक उंच गणेशमूर्ती हे गणेशगल्लीचं वैशिष्ट्य राहिलंय.


यंदा श्रीराम जन्मभूमी 'अयोध्या' इथलं राम मंदिर हे मंडळाच्या संकल्पनेतून साकारण्यात येणार आहे. तसंच भाविकांचं श्रद्धास्थान असलेला 'मुंबईचा राजा' हा राजेशाही थाटात विराजमान होणार आहे.

यावर्षीची थीम : अयोध्या इथल्या राम मंदिराची प्रतिकृती

कुठे : गणेश गल्ली (लेन), लालबाग

जवळील रेल्वे स्टेशन : चिंचपोकळी, करीरोड आणि लोअर परेल

कसे पोहोचाल : लोअर परेल रेल्वे स्टेशनला उतरा. तिकडून टॅक्सीनं किंवा चालत गणेश गल्लीचा गणपती गाठू शकता.


) चिंचपोकळीचा चिंतामणी

चिंचपोकळीचा चिंतामणी चांगलाच ‘फेमस’ होऊ लागला आहे तो त्यांच्या आगमन सोहळ्यामुळे. याचं एक कारण म्हणजे लालबागचा राजा, तेजुकाया आणि गणेशगल्ली या ठिकाणचे गणपती जागेवरच तयार केले जातात. मात्र ज्या गणपतींचं आगमन केलं जातं त्यामध्ये चिंचपोकळीच्या चिंतामणीचा मान पहिला आहे.


१९२० साली मंडळाची स्थापना झाली असून यावर्षी चिंतामणी शतक महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. चिंतामणीलादेखील महालासारखी सजावटच केली जाते. मूर्तीला साजेशी सजावट हेच या मंडळाचं वैशिष्टय़ आहे. लोभस मूर्तीमुळे हा गणपती अधिक प्रसिद्ध होत आहे. फक्त गणेशोत्सवात एकदाच वर्गणी काढायची आणि वर्षभर सामाजिक कार्य सुरु ठेवायचे ही परंपरा उत्सव मंडळाने आजही जपून ठेवली आहे.

यावर्षीची थीम : केरळच्या प्रसिद्ध शिव मंदिराची प्रतिकृती

कुठे : दत्ताराम लाड मार्ग

जवळचे स्टेशन : चिंचपोकळी

कसे पोहोचाल : चिंचपोकळी स्टेशनपर्यंत ट्रेननं प्रवास, स्टेशनच्या बाहेरच असल्यानं स्टेशनला उतरून तुम्ही चालत देखील जाऊ शकता.


) गिरगावचा राजा

सोळा फुटाची शाडूची मूर्ती ही गिरगांवच्या राजाचं वैशिष्ट्यच म्हणता येईल. शाडूची ही मुंबईतील एकमेव मूर्ती आहे असं म्हटलं तरी चालेल. या ठिकाणीदेखील राजाच्या राजमहालासारखीच सजावट असते.

१९२८ साली रामचंद्र तेंडुलकर यांनी गिरगावच्या राजाची स्थापना केली गेली. यावर्षी त्यांचे ९२ वे वर्ष आहे. २ सप्टेंबरला या बाप्पाचं आगमन होणार असून १२ सप्टेंबरला विसर्जन करण्यात येईल.

कुठे : निकदवरी लेन

जवळचे स्टेशन : चर्नीरोड

कसे पोहोचाल : चर्नी रोडला उतरून काही अंतर चालत गेल्यावर गिरगावचा राजाचं दर्शन घेता येईल.


) केशवजी नाईक चाळगिरगाव

शहरातील सर्वात पहिली सार्वजनिक गणपती पूजा जी १८९३ मध्ये सुरू झाली होती. यावर्षीचे त्यांचं १२७ वं वर्ष आहे. हे मंडळ त्याच्या पर्यावरण-अनुकूल उत्सवासाठी आणि लहान गणेश मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. हा गणपती लोकमान्य टिळकांनी सुरू केला होता. या ठिकाणी अजिबात भव्य-दिव्य मूर्ती पाहायला मिळणार नाही. मागील ४ पिढ्यांपासून एकच कुटुंब इथली मुर्ती बनवत  आहे.


आपली परंपरा जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. लाउडस्पीकर, ढोल-ताशाविनाची ही पूजा एक पारंपारिक प्रथा इथं दिसून येते. इथली आयोजन समिती नियमितपणे भजन कार्यक्रम, मुलांसाठी स्पर्धांचं आयोजन करते. या मंडळाला भेट देण्यासाठी सर्वात व्यस्त कालावधी म्हणजे सकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंतचा असतो.


यावर्षीची थीम :  दरवर्षी साधेपणानं मूर्तीची स्थापना होते.

कुठे : केशवजी नाईक चाळ, खाडीलकर रोड, मंगलवाडी, गिरगाव

जवळचे स्टेशन : चर्नी रोड

कसे पोहोचाल : चर्नी रोड स्टेशनला उतरावं. स्टेशनवरून खाडीलकर रोडसाठी टॅक्सी करू शकता. तिकडे केशवजी चाळीबद्दल विचारलं तर लगेचच सांगतील.


) अंधेरीचा राजा

उपनगरातला प्रसिद्ध गणपती म्हणजे अंधेरीचा राजा. ही मूर्ती नेहमीच सिंहासनास्थ विराजमान झालेली असते. या राजाचं वैशिष्टय़ म्हणजे हा गणपती तुम्हाला दहाच दिवसात बघायला हवं असं अजिबात नाही. कारण अंधेरीचा राजाचं एकवीस दिवसांनी म्हणजे येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विसर्जन होते. 


आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीनं १९६६ साली या गणपतीची स्थापना केली होती. दरवर्षी मंडळ एका वेगळ्या थीमवर गणपतीची सजावट करते. यावर्षी पुण्यातील प्रसिद्ध महागणपती मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

यावर्षीची थीम :  पुण्यातील प्रसिद्ध महागणपती मंदिराची प्रतिकृती

कुठे : वीरा देसाई रोड, आझाद नगर, अंधेरी (.)

जवळील स्टेशन : अंधेरी

कसे पोहोचाल : अंधेरी स्टेशनला उतरून आझाद नगर २ साठी रिक्षा करू शकता.



हेही वाचा

गणेशोत्सव २०१९ : बाप्पाला 'कॅनव्हास'ची सजावट

गणेशोत्सव २०१९ : 'या' दिवशी होणार तुमच्या लाडक्या बाप्पाचं आगमन




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा