राजेशाही थाटात मिरवणूक झाल्यानंतर बुधवारी सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले. 10 दिवसांची मनोभावे पूजा केल्यानंतर मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली होती. आपल्या लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांनी नेहमीप्रमाणे यंदाही गर्दी केली होती.
लालबागच्या राजाची मंगळवारी सकाळपासून ते रात्रीपर्यंत मिरवणूक काढल्यानंतर बुधवारी सकाळी 6 वाजता सर्वांच्या या लाडक्या बाप्पाचे आगमन गिरगावच्या चौपाटीवर झाले. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान बाप्पाची मूर्ती तराफ्यातून खोल समुद्रात नेण्यात आले आणि बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी पुढच्या वर्षी लवकर याचे निमंत्रण देत अनेक भाविकांनी साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप दिला.
पोलीस आणि जीवरक्षक दलाच्या कडेकोट बंदोबस्तात लालबागच्या राजासह दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन पहाटेपर्यंत सुरूच होते.