Advertisement

पालघर जिल्ह्यात होळीवर निर्बंध, संपूर्ण राज्यातही शक्यता

होळी सण अवघ्या ७ दिवसांवर आला असून, नागरिकांनी होळीच्या तयारीला सुरुवात केली आहे.

पालघर जिल्ह्यात होळीवर निर्बंध, संपूर्ण राज्यातही शक्यता
(Representational Image)
SHARES

होळी सण अवघ्या ७ दिवसांवर आला असून, नागरिकांनी होळीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मात्र सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या वाढत्या प्रदूर्भावामुळं राज्य सरकारनं ठिकठिकाणी कडक निर्बंध लावले आहेत. अशातच आता होळी सणावर ही कोरोनाचं सावट येण्याची शक्यता आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता होळीबाबत मुंबईजवळच्या पालघर जिल्ह्यानं अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, असा निर्णय राज्यभरासाठीही घेतला जाऊ शकतो, असं बोललं जात आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडाही वेगानं वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झालं आहे. त्यातूनच होळी सणाबाबत पालघर जिल्हा प्रशासनानं आतापासूनच मोठं प्रतिबंधात्मक पाऊल उचललं आहे. पालघर जिल्ह्यात होळीबाबत मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.

प्रशासनाच्या आदेशानुसार, पालघर जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी तसेच हॉटेल्स आणि रिसॉर्टवर होळी सेलिब्रेशन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. येत्या २८ मार्च रोजी होळी पौर्णिमा आहे तर २९ मार्च रोजी धूलिवंदन आहे. यादरम्यान कोणत्याही प्रकारे एकत्र येऊन सेलिब्रेशन करण्यास जिल्ह्यात मनाई राहणार आहे. पालघर जिल्ह्यात बीचेस तसेच रिसॉर्ट मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्व ठिकाणी होळी सेलिब्रेशनसाठी मोठी गर्दी होत असते.

मुंबईतून मोठ्या प्रमाणात लोक ग्रुपनं तसेच कुटुंबासह येथे येऊन होळी साजरी करत असतात. ही बाब लक्षात घेऊनच जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक पाऊल टाकले आहे. बंदी आदेश मोडला गेल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा, महाराष्ट्र कोविड १९ नियम तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आदेशात देण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी वसतिगृहे आजपासून बंद करण्यात आली आहेत. पालघर जिल्ह्यात आतापर्यंत करोनाचे एकूण ४७ हजार ६६ रुग्ण आढळले असून ४५ हजार २९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर १२०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी जिल्ह्यात नवीन १२० रुग्णांची भर पडली असून, सध्या १ हजार १५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा