Advertisement

यांच्या उत्साहाला तोड नाही!


SHARES

चेहऱ्यावर निरागस हास्य..काहीतरी करुन दाखवायची जिद्द..आणि खांद्याला खांदा लावून थर लावणारे गोविंदा...तुम्ही म्हणाल, की यात काय विशेष आहे? दहीहंडीच्या काही दिवस आधी प्रत्येक गोविंदा पथक अशाच प्रकारे सराव करताना दिसतं. अशाच प्रकारे थर लावले जातात, अशाच प्रकारे सराव केला जातो आणि अशाच प्रकारे गोविंदा उभे देखील रहातात. पण रुईया महाविद्यालयाच्या समोर असणाऱ्या दडकर ग्राऊंडवरचा हा सराव काहीसा वेगळा आहे.

इथे सराव करणारे हे गोविंदा अंध आहेत. पण त्यांच्या अंधत्वाचा कोणताही परिणाम त्यांच्या सरावावर, त्यांच्या जिद्दीवर किंवा त्यांच्या उत्साहावर दिसत नाही. आणि हीच या गोविंदांची खासियत आहे!

2014 साली महाराष्ट्रातलं हे पहिलं अंध मुलांचं गोविंदा पथक सुरु झालं. गेल्या 4 वर्षांत 60 ते 70 ठिकाणी थर लावले. आणि कुठेही यांचे थर कोसळले नाहीत. यावर्षी मुंबईतली दहीहंडी संपवून पुण्याला जायचाही विचार आहे.

शार्दूल म्हाडगुत, विश्वस्त, नयन फाऊंडेशन


उत्साह आणि आनंद पसरवणाऱ्या दहीहंडी सणाकडे खऱ्या अर्थाने डोळसपणे बघितलं ते नयन फाऊंडेशनने. मुंबईत सध्या तीन अंध मुलांच्या शाळा आहेत. अंधत्वामुळे या मुलांना दहीहंडीसारख्या सणात सहभाग घेता येत नव्हता किंवा त्याचा आनंद लुटता येत नव्हता. मात्र गेल्या चार वर्षांपासून यांची दहीहंडी अशाच उत्साहात साजरी होत आहे.

रोज आम्ही एक ते दीड तास सराव करतो. साधारण 16 ते 17 मुली आमच्या महिला पथकात आहेत. एकमेकींना पाठीवर थाप मारून आम्ही संवाद साधतो आणि थर रचतो.

सिद्धी पोस्टुरे, महिला गोविंदा


हे माझं सलग तिसरं वर्ष आहे. सराव करताना आम्ही एकमेकांना कुठे उभं रहायचं हे आधी सांगून ठेवतो. आणि मग प्रशिक्षकांच्या शिटीनुसार थर लावतो.

हरीष शिंदे, गोविंदा


अगदी सराईतपणे हे गोविंदा थर रचण्यासाठी सरसावतात. त्यांचे मार्गदर्शक शिट्टी वाजवतात आणि एकमेकांना सावरत हे गोविंदा एकावर एक थर रचू लागतात. दहीहंडी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना दडकर ग्राऊंडवर या गोविंदांचा जोरदार सराव सुरु आहे. गेल्या चार वर्षांपासून नयन फाऊंडेशन या गोविंदांचा असाच सराव करुन घेत आहे.

हे सगळं करताना अडचणी खूप येतात. दरवर्षी आमच्याकडे फक्त मुलांचीच दहीहंडी होते. यावर्षी आम्ही मुलींचेही थर लावायला सुरुवात केली आहे. दादर, परळ, घाटकोपर, ठाणे आणि वेस्टर्न लाईनवर जोगेश्वरीपर्यंत आम्ही जातो.

देवेंद्र पोन्नलगर, अध्यक्ष, नयन फाऊंडेशन



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा