Advertisement

'इतक्याच' गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, अनेक गणेशोत्सव मंडळांच्या परवानगीचा प्रश्न सुटलेला नाही.

'इतक्याच' गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी
SHARES

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, अनेक गणेशोत्सव मंडळांच्या परवानगीचा प्रश्न सुटलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवापर्यंत मुंबईतील केवळ ३०४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यास परवानगी देण्यात आली, तर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करू न शकलेल्या ८६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगी नाकारण्यात आली. मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत.

या १२ हजार मंडळांपैकी काही मंडळे चाळी, इमारतीच्या आवारात, खासगी मालमत्तांच्या पटांगणात गणेशोत्सव साजरा करतात, तर काही मंडळे सार्वजनिक मैदाने, पदपथ, रस्त्यावरच मंडप उभारून उत्सव साजरा करतात.

गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्यासाठी मंडळांना दरवर्षी पालिका, स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागते. मंडप परवानगीसाठी पालिकेने एक खिडकी योजना जाहीर केली असून मंडळांना महापालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये जाऊन अथवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. यंदा मंडप परवानगीसाठी पालिकेला १,२८८ अर्ज प्राप्त झाले. पडताळणीअंती १४१ मंडळांनी दोन वेळा अर्ज केल्याचे निदर्शनास आले आहे.

उर्वरित १,१४७ मंडळांपैकी ३०४ मंडळांना मंडप परवानगी दिली आहे, तर ८६ मंडळांना परवानगी नाकारण्यात आली आहे. ७५७ मंडळांचे अर्ज विविध पातळ्यांवर प्रक्रियेत आहेत. पडताळणीअंती त्यांनाही परवानगी मिळेल.

यंदाही गणेशोत्सवावर करोनाचे सावट आहे. वर्गणी गोळा करण्यास तसेच जाहिराती झळकाविण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे मंडळांची आर्थिक कोंडी झाली आहे. अद्याप मंडप परवानगी न मिळाल्यामुळे मंडळांसमोर पेच निर्माण झाला आहे.

गेल्या वर्षी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने गणेशोत्सवावर निर्बंध घातले. या र्निबधांचे मंडळांनी काटेकोरपणे पालनही केले होते. गेल्या वर्षी कोरोना संसर्गाचा धोका आणि निर्बंध लक्षात घेऊन काही मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. काही मंडळांनी माघ महिन्यात गणेशोत्सव साजरा केला. येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने पुन्हा गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा