Advertisement

डीजेवरून वाद, भांडुप, कुर्ल्यात विसर्जन मिरवणुका जागीच थांबल्या


डीजेवरून वाद, भांडुप, कुर्ल्यात विसर्जन मिरवणुका जागीच थांबल्या
SHARES

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यास बंदी असल्यानं भांडुपमधील गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या मंडपापुढे डीजे वाजवून न्यायालयाचा निषेध नोंदवला. यामुळे साईहिल परिसरातून पुढे जाणाऱ्या सर्व मिरवणुका रात्री दहा वाजेपर्यंत एका जागीच खोळंबल्याने भाविक आणि वाहनांची मोठी गर्दी उसळली होती. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर दहाची वेळ पाळत या मंडळांनी डीजे बंद करून मिरवणुकीला मोकळी वाट करून दिली. या प्रकाराने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

तर, कुर्ल्यातही पोलिसांनी मिरवणुकीतील डीजे बंद केल्याचा निषेध म्हणून गणेशोत्सव मंडळांनी सर्व मिरवणुका जागीच थांबवल्या. यामुळे कुर्ल्यातही प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. 

मुंबईत यंदा डीजेसह मोठ्या आवाजाची वाद्ये वाजवण्यास बंदी असल्यामुळे अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी पारंपरिक वाद्ये वाजवून भांडुपमधील गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुका काढल्या. परंतु काही मंडळांना मिरवणुकीत डीजे साऊंडचा वापर करायचा होता.

पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारल्यामुळे या मंडळांनी लोकप्रतिनिधींकडेही दाद मागितली. मात्र याबाबत न्यायालयाचेच आदेश असल्यामुळे त्यांनीही याप्रकरणी मंडळांची कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे साईहिल गणेशोत्सव मंडळ, नगरदास नगर गणेशोत्सव मंडळ, सर्वोदय नगर गणेशोत्सव मंडळ आणि कोकण नगर गणेशोत्सव मंडळ यांनी गणेश विसर्जन मिरवणुका जागीच थांबवत डीजे वाजवून निषेध केला.

भांडुपमधील सर्व गणेश मूर्ती विसर्जनासाठी साईहिल परिसरातून पुढे जात शिवाजी तलावाजवळ येतात. मात्र साईहिलसोबतच नरदास नगर, टेंबीपाडा, शिवाजीनकर, नवजीवन शाळा, गणेश नगर, सर्वोदय नगर आदी भागांमध्ये या मिरवणुका थांबवण्यात आल्याने या मार्गावर दोन तासांहून अधिक काळ मोठी वाहतूककोंडी आणि ध्वनी प्रदूषण झाले. अखेर पोलिसांना हस्तक्षेप केल्यानंतर या मिरवणुका पुढे निघाल्या.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा