मालाडच्या एरंगळ गावात जत्रेला सुरुवात

 Erangal
मालाडच्या एरंगळ गावात जत्रेला सुरुवात

एरंगळ गाव - राष्ट्रीय एकोपा आणि सर्वधर्मस्नेहभाव जोपासणाऱ्या संत बोनाव्हेंचर जत्रेला मालाडमधील एरंगळ गावात रविवारी सुरुवात झाली. मुंबईतील कानाकोपऱ्यातील ख्रिस्ती आणि कोळी बांधव तसंच विविध धर्माच्या नागरिकांनी या जत्रेला मोठया संख्येने उपस्थिती लावली.

विविध खादयपदार्थांचे आणि वस्तूंचे स्टॉल, आकाशपाळणा, लहान मुलांचे विमान, रेल गाडी, समुद्रकिनाऱ्यावरील घोडेस्वारी या जत्रेत पाहायला मिळाली.

दरवर्षी जानेवारीच्या दुसऱ्या रविवारी एरंगल गावातील संत बोनाव्हेंचर चर्चमध्ये वार्षिक सोहळा आणि परिसरात जत्रा भरते. या जत्रेची सुरुवात आदल्या रात्री गावालगतचे ख्रिस्ती बांधव करतात, तर जत्रेचा शेवट गावातले हिंदू बांधव करतात. ही परंपरा आजही जोपासली जाते, हे या जत्रेचं वैशिष्टय आहे. एरंगळ गावात इ. स. 1575 साली बांधलेलं हे एक जुनं चर्च असून ते पश्चिमाभिमुख आहे. दर्याच्या वाऱ्यावादळाशी सामना करत गेली जवळपास 450 वर्ष हे चर्च दऱ्याकिनारी उभं आहे.

संत बोनाव्हेंचर हे शांततेचे दूत म्हणून ओळखले जात असून दरवर्षी मोठया संख्येनं मुंबईभरातून नागरिक या जत्रेला उपस्थिती लावून आनंद घेत असल्याचं चर्चचे ब्रदर सचिन मुंतोडे यांनी सांगितले.

Loading Comments