Advertisement

परदेशवारी करणारे वाशीचे खेकडे!


SHARES

महाराष्ट्र खाद्य संस्कृतीतला एक आवडता पदार्थ म्हणजे चिंबोरी, म्हणजेच खेकडा. तुमच्या डोळ्यांसमोर खेकड्याचे एक ना अनेक पदार्थ आले असतील. खेकड्याचं झणझणीत कालवण, भरले खेकडे, खेकडा लॉलीपॉप आणि बरंच काही...आहाहा...तोंडाला पाणी सुटलं. आपण आस्वाद घेणारे खेकडे समुद्र आणि खाडीतून येतात हे सर्वांनाच माहीत असेल. पण आम्ही तुम्हाला ज्या खेकड्यांबद्दल सांगणार आहोत त्यांची बातच काही और... 

हिरव्या-लाल रंगाच्या टपोऱ्या-टपोऱ्या चिंबोऱ्या. मस्त भरलेल्या एका चिंबोऱ्याचे वजन अडीच-तीन किलो. या वजनदार चिंबोऱ्यांशी दोन हात करणाऱ्या या आहेत नवी मुंबईतल्या वाशी गावात राहणाऱ्या गुनाबाई सुतार. शिक्षण फक्त पहिली पास. पण वयाच्या आठव्या वर्षापासून खेकडे पकडण्यात त्या अगदी माहीर! वयाच्या ६५ व्या वर्षीही त्यांचा खेकडे पकडण्याचा उत्साह वाखणण्याजोगा आहे. फळीवरून फिरत बिनधास्त चिखलात हात घालून अगदी शिताफीनं त्या खेकडे पकडतात.

खेकड्याला हात लावताच तो भरलेला आहे की रिकामा, हे गुणाबाईंना लगेच समजतं. भरलेल्या खेकड्याची किंमत जास्त आणि रिकाम्या खेकड्याची किंमत कमी असते. त्यामुळे रिकामा खेकडा पुन्हा तलावात सोडला जातो. या खेकड्यांना दोन वेळचं जेवण दिलं जातं. त्यात वाम, मुशी माश्यांचे तुकडे खाण्यासाठी दिले जातात. १५-२० दिवसांतच खेकडे चांगले मोठे आणि खाण्याजोगे होतात. त्यानंतरच या खेकड्यांना बाहेर काढलं जातं. खेकडे एकमेकांना चावू नयेत म्हणून त्यांच्या नांग्या दोरीनं बांधल्या जातात. या खेकड्यांना एका थंड खोलीत म्हणजे शीतपेटीत ठेवलं जातं आणि मागणीनुसार खेकड्यांची निर्यात केली जाते.

नवी मुंबईतल्या वाशी गावात गुनाबाई आणि त्यांचे अडीच-तीन किलोचे खेकडे प्रचंड लोकप्रिय. पण फक्त मुंबईतच नाही तर परदेशातही. अगदी घरा-घरात आणि हॉटेलांमध्येही गुनाबाईंच्या खेकड्यांची चव पोहोचलीये. हॉटेलांमध्ये ५ ते २० किलोपर्यंत खेकड्यांची मागणी असते. तर परदेशात ५०० किलोपर्यंतचे खेकडे पोहोचवले जातात. सध्या सिंगापूर, मलेशिया या देशांना खेकडे पुरवले जातात. एक एकर तलावात गुनाबाई खेकडा संवर्धनाचा व्यवसाय करतात. गुनाबाईंच्या तलावात दोन जातींचे खेकडे आढळतात. लाल खेकडे हे आकारानं छोटे असतात. ज्यांचं वजन २.५ ते ४ ग्रॅम इतकं असतं. बाजारात त्यांची किंमत ३५०-४०० रुपये इतकी आहे. हिरवे खेकडे हे आकारानं मोठे असतात. एका खेकड्याचे वजन १ ते ३ किलोच्या आसपास असते. ज्याची बाजारात किंमत १२०० ते १४०० रुपये इतकी आहे. लाल खेकडे हे मुंबईत जास्त विकले जातात. हिरव्या खेकड्यांना परदेशात जास्त मागणी आहे. पावसाळ्याचे चार महिने तर खूप व्याप असतो. कारण याच काळात मोठ्या प्रमाणात खेकड्यांची पैदास होते.

आठ वर्षांची असताना बाबांसोबत मासे आणि खेकडे पकडायला वाशी खाडित जायचे. तेव्हापासूनच सवय लागली. त्यांच्याकडूनच शिकले व्यवसाय कसा करायचा, मासे, खेकडे कसे पकडायचे. त्या वेळी वाशीला रेल्वे येत नव्हती. तेव्हाची वाशी खाडी खूप मोठी होती. खाडीत उतरून मासे आणि खेकडे पकडायचो. त्यानंतर हातहोडीने मानखुर्दला जायचो. तिकडून रेल्वे पकडून मुंबईला मासे आणि खेकडे विकण्यासाठी जायचो. दादर, भायखळा, परेल, आगरबाजार, सिटी लाईट, ग्रँड रोड अशा अनेक मार्केटमध्ये मासे आणि खेकड्यांना चांगला भाव मिळायचा. त्यानंतर चेन्नईला माझा माल निर्यात करू लागले. हळूहळू व्यवसाय वाढत गेला आणि त्यांनंतर खेकडे निर्यात करण्यासाठी स्वत:ची परवानगी घेतली. खेकडे निर्यात करण्यासाठी लागणारे सर्व परवाने मुलगा सुभाषच्या मदतीनं काढून घेतले. त्यानंतर परदेशातही निर्यात करू लागले.
- गुनाबाई सुतार

गुनाबाई यांचा मुलगा सुभाषनं सुद्धा सुरुवातीपासून खेकडा व्यवसायात साथ दिली. लहानपणापासून आईला व्यवसाय करताना ते पाहायचे. त्यामुळे या व्यवसायातले सर्व छक्के-पंजे सुभाष यांना चांगलेच माहीत आहेत. शिक्षण घेत सुभाषनं सुरुवातीला अकाऊंट्स डिपार्टमेंट हातात घेतलं. त्यानंतर आईच्या खांद्याला खांदा लाऊन सुभाष यांनी सर्व जबाबदारी पार पाडली. खेकडा व्यवसायाला चालना मिळावी यासाठी तरुणांना मार्गदर्शन देण्याचे कामही सुभाष करतात. खेकडे कसे पकडायचे? त्यांची विक्री कशी करायची? याबद्दल सर्व तरुणांना शिकवलं जातं. त्यानंतर पुढच्या प्रशिक्षणासाठी या तरुणांना चेन्नईमध्ये असलेल्या खेकडा सेंटरमध्ये पाठवलं जातं.

खेकडा व्यवसायाचा शाश्वत मच्छिमारीत समावेश होतो. खेकडा व्यवसायासाठी महाराष्ट्राचं वातावरण खूप चांगलं आहे. म्हणून बरेच तरूण या व्यवसायाकडे वळत आहेत. समुद्री उत्पाद निर्यात विकास प्राधिकरणाच्या सर्वेनुसार नवी मुंबईच्या समुद्र किनारी ४५० तलाव आहेत. या तलावात मत्स्यशेतीबरोबरच खेकड्यांची शेती करण्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे सर्वेनुसार या तलावांना रीतसर परवानगी दिली तर मच्छिमारांना उत्पादन करण्याचं साधन मिळेल आणि नवी मुंबईच्या उत्पादनात भर पडेल. या शिवाय खेकडा व्यवसायात महाराष्ट्राचं नावही उंचावेल.
-सुभाष सुतार, गुनाबाईंचा मुलगा

गुनाबाई आणि सुभाष यांनी तलाव उभारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. खेकड्यांच्या संवर्धनासाठी तलावाची संरचनाही भन्नाट आखण्यात आली आहे. भरती आणि ओहोटीची वेळ ध्यानात ठेवून समुद्रातून आलेलं पाणी या तलावात सोडलं जातं. त्यासाठी छोटा बांधदेखील बांधण्यात आला आहे. या बांधाच्या मदतीनं भरतीच्या वेळी वाढलेलं पाणी दरवाजे उघडून तलावात सोडलं जातं. जवळपास दर आठ-दहा दिवसांनी तलावातील पाणी बदललं जातं.

खरंच आज नवी मुंबईतले खेकडे सातासमुद्रापार पोहोचले आहेत ते केवळ गुनाबाई यांच्या जिद्द आणि मेहनतीमुळे. शिवाय त्यांच्या या व्यवसायानं अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अनेकांनी त्यांचं मार्गदर्शन घेऊन स्वत:चा व्यवसायही उभारला आहे. त्यामुळे शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं हे गुनाबाई यांना चांगलंच ठाऊक आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा