Advertisement

श्रावण संपला, मुंबईतल्या 'या' ५ हॉटेलमधल्या 'नॉन व्हेज'वर मारा ताव

श्रावण सुरू आहे नॉनव्हेज खाऊ नको, असं आई देखील तुम्हाला बजावणार नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला ५ रेस्टॉरंट्सची नावं सांगणार आहोत जिकडे नॉनव्हेज पदार्थांचा किंवा थाळीचा आस्वाद घेऊ शकता.

श्रावण संपला, मुंबईतल्या 'या' ५ हॉटेलमधल्या 'नॉन व्हेज'वर मारा ताव
SHARES

नुकताच श्रावण महिना संपला. गणपती देखील गेले. म्हणजे आता तुम्ही नॉनव्हेज पदार्थांवर ताव मारायला मोकळे. श्रावण सुरू आहे नॉनव्हेज खाऊ नको, असं आई देखील तुम्हाला बजावणार नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला काही रेस्टॉरंट्सची नावं सांगणार आहोत जिकडे नॉनव्हेज पदार्थांचा किंवा थाळीचा आस्वाद घेऊ शकता.


) आत्मशांती हॉटेल

मुंबईतलं अगदी जुन्या हॉटेलांपैकी एक हॉटेल म्हणजे आत्मशांती. साधारण १९१० च्या आसपास अनंत रामचंद्र पाडलेकर यांनी हे हॉटेल सुरू केलं.  मांसाहारी जेवण हे आत्मशांतीची खासियत आहे. इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मटणाचे पदार्थ. मटणाबरोबरच इथे भेजा, खिमा आणि इतर पदार्थही इथले वैशिष्ट्य म्हणावेत असे.  इथली स्पेशल डिश वजरी ही कोकणी मसाल्यात तयार केलेली असते. त्यामुळे ती थोडीशी चटकदार आणि काहीशी तिखट अशी आहे.


एक खास बिर्याणीही इथे मिळते. ही बिर्याणीही मराठी, कोकणी, पश्चिम महाराष्ट्र आणि मोगलाई मसाल्यांचं एक खास कॉम्बिनेशन असतं. त्यावर तळलेला कांदा टाकून त्याची चव अगदी खास केली जाते. केवळ साधा भात घेतलात तर त्यासोबत माशाचा आणि मटणाचा रस्सा हवा तेवढा वाढला जातो. ही फिश करी खास कोकणी आणि मंगलोरी चवीच्या एकत्रीकरणातून आलेली आहे. भात आणि माशाच्या कढीसोबत एका प्लेटमध्ये तुम्हाला माशाचे तळलेले दोन तुकडे दिले जातात. पोटभर जेवणावर एक ग्लास खास सोलकढी तर झालीच पाहिजे.


कुठे : शॉप नंबर १४, पृथ्वीनंदन सोसायटी, लोअर परेल, ना. . जोशी मार्ग पोलिस ठाण्याच्या अगदी समोर

वेळ : सकाळी ११ ते दुपारी ४ आणि रात्री ८ नंतर रात्री १२ पर्यंत, (गुरुवारी बंद)


) राजू मालवणी कॉर्नर

मूळचे वेंगुर्ला, तुळसगावचे असलेल्या राजू सावंत ऊर्फ राजू यांची आई गुणवंती गोविंद सावंत यांनी १९८६ साली ‘राजू मालवणी कॉर्नर’ची सुरुवात केली. ओल्या नारळाचं भरपूर वाटण लावून केलेली कोंबडी सागोती आणि वडे ही राजू मालवणी कॉर्नरची खासियत. ब्रॉयलर कोंबडी ही पटकन शिजत असली तरी ती चवीला खास नसते. म्हणून इथं कोंबडीच्या सर्व पदार्थांसाठी गावठी कोंबडीच वापरली जाते. त्याचबरोबर कोंबडी मसाला, मटन मसाला, खिमा, कलेजी, बांगड्याचा रस्सा या सगळ्याचा तुम्ही तांदूळ, ज्वारी, बाजरीची भाकरी आणि आंबोळीसोबत आस्वाद घेऊ शकता.

माशांमध्ये सुरमई, पापलेट, हलवा फ्राय, खेकडे, सुका जवळा ही खास मालवणी पद्धतीनं तयार केलेली मासोळी तुम्हाला चाखायला मिळेलमालवणी लोकांची खासियत असलेला कोळंबी भात इथं नक्की ट्राय करा.

सर्व पदार्थ घरून तयार करून आणले जातात. फक्त कोंबडी वडे आणि मासे तळण्याचं काम गाडीवर केलं जातं. इथं मिळणारी सोलकढीसुद्धा स्पेशलच आहे. कारण त्यासाठी कोकणातून आणलेला आगळच वापरला जातो.

कुठे : राजू मालवणी कॉर्नर, अनंत पाटील मार्ग, सचिन हॉटेलसमोर, गोखले रोड, दादर (पश्चिम)

वेळ : दररोज संध्याकाळी ७.३० ते रात्री ११.३० पर्यंत


) गावकरी

सुजीत पाटील या सुशिक्षीत तरुणानं सप्टेंबर २०१७ साली न्यू प्रभादेवी रोडवर सूर्योदय अपार्टमेंट इथं मुंबईतील गावकरीची पहिली फ्रॅन्चाईजी सुरू केली. खास कोल्हापुरातून तयार केलेल्या हँडमेड मसाल्यांमुळे या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सर्व पदार्थांना एक वेगळीच चमचमीत चव प्राप्त झाली आहे.

गावकरी हॉटेलच्या माध्यमातून कोल्हापुरी पद्धतीचा मेनू दिला जातो. चिकन आणि मटण प्रकारात १० थाळी, १ गावकरी स्पेशल थाळी, ३ प्रकारच्या फिश थाळी, व्हेज, नॉनव्हेज स्टार्टर्स, इंडीयन सूप, पाया सूप आणि सर्वात खास म्हणजे गावकरीची सोलकढी असा सुनियोजित मेनू हॉटेलमध्ये उपलब्ध आहे. संपूर्ण वातानुकूलीत असणाऱ्या गावकरीमध्ये एकावेळी ४० खवय्ये बसू शकतील, अशी आसनव्यवस्था आहे.

ब्लॅक मटण ग्रेव्ही, चिकन ड्राय फ्राय, मटण लोणचे इथली खासियत आहे. कोल्हापुरात जसा चमचमीत पांढरा-तांबडा रस्सा मिळतो तशीच चव गावकरीत लागते. सर्वात महत्त्वाचं प्रत्येक थाळीसोबत अमर्याद तांबडा-पांढरा रस्सा दिला जातो. जेवणाच्या अखेरीस थंडगार सोलकढी अफलातून असते.  फीश फ्राय कोल्हापुरी मसाल्यात तर फीश मसाला मालवणी पद्धतीनं इथं बनवला जातो.

कुठे : शॉप ५, सुर्योदय हाऊसिंग सोसायटी, सामना प्रेसच्या पुढे, प्रभादेवी

वेळ : सकाळी ११.३० ते दुपारी ३.३०, संध्याकाळी ७ ते ११.३० पर्यंत, ( सोमवारी सकाळ सत्र बंद)


) थीरम

थीरम या रेस्टॉरंटची खासियत म्हणजे केरळच्या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेणे. केरळमधील कालिकतचे मूळ रहिवासी असलेल्या रबिन बालन आणि निखिल चंद्रन या दोन मित्रांनी ही पारंपरिक मेजवानी मुंबईकरांसाठी आणली आहे.

इथं मासे खायचे असतील तर केरला स्टाईल फिश मोली, कुडंपुलीयीट्टामीन करी, फिश कुरूमुलकिट्टथू, फिश थेंगाअराचथू हे प्रकार आहेत. चिकन मुलाकिट्टथू, चिकन कुर्मा, नादान कुरूमुलाकूकोझी, कंथारी चिकन, चिकन उलारथियथू, चिकन वारूथरचाथू हे कधीही न ऐकलेले पदार्थ आहेतच पण याची बनवण्याची पद्धत वेगळी आहे. केरला चिकन स्टयू हे पूर्णपणे तूप आणि नारळाच्या दुधामध्ये तयार केलं जातं.


इथली मलबार दम बिर्याणी केळीच्या पानात आणि कॉटनच्या कपड्यांमध्ये वाफवून ती तयार केली जाते. खोबरं, हिरव्या मिरचीची चटणी आणि रायत्यासोबत ती सव्‍‌र्ह केली जाते. साध्या पराठासोबतच इथं चिकन कोथू पराठा, अंड कोथू पराठा, स्टफ पराठा आणि चिली पराठासुद्धा आहे. कोलंबीच्या किंवा मटणाच्या कालवणामध्ये वाफवलेले राईस डम्पलिंग्स टाकून तयार करण्यात येणारा कोझिपिडी हा प्रकारही नक्की ट्राय करा.

कुठे : चर्च रोड, कलिना, अवर लेडी ऑफ इजिप्त चर्च, सांताक्रूझ (पूर्व)

कधी : सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत


) नमस्कार

 स्टफ बोंबिल आणि स्टफ पापलेट म्हणजे इथली खासियत. स्टफ पापलेट, बोंबिलमध्ये कोळंबीचा खिमा भरला जातो. पण इथं मात्र हिरवी चटणी भरली जाते. ही हिरवी चटणी केवळ मिरची आणि कोथिंबिरीची नाही तर त्यात येते ती पुदिन्याची एक तरल चव. त्यामुळे ते अधिकच स्वादिष्ट लागतात. आणखीन एक डिश म्हणजे प्रॉन्स चिली तवा फ्राय विथ शेल. यात कोळंबीचं शेपटीकडचं आवरण काढलं जात नाही. अख्खा लसूण आणि मिरचीच्या फोडणीनेच या पदार्थाला चव दिली जाते. हा मसालेदार नसलेला पण तरीही कोळंबीची पूर्ण चव देणारा पदार्थ असल्याने त्याची चव जिभेवर रेंगाळत राहते.

इथले ‘माकली नमस्कार’ही आवर्जून खावेत असे आहेत. मिरची, कोथिंबीर, काळीमिरीत बनवलेले ‘माकली नमस्कार’ नमस्कारची खासियत आहेत. याव्यतिरिक्त नेहमीचे सुरमई, कोळंबी, बांगडा, मांदेली फ्राय आणि कालवण असे नेहमीचे प्रकार आहेतच.

सुक्या माशांमध्ये रस्स्यातील सुका बोंबिल बटाटा, सुकी करंदी आणि जवळा चटणीला विशेष मागणी आहे. बटर चिकन हे साधारण गोडसर असतं. परंतु इथलं मालवणी पद्धतीचं बटर चिकन चमचमीत आहे. त्याला थोडा घरगुती ‘टच’ देण्यात आला आहे.

स्टार्टर्समध्ये चिकन चटपटाला ‘डिमांड’ आहे. मसाला लावून तव्यावर चिकन फ्राय केले जाते. थाळीमध्येही मटण थाळी, चिकन थाळी, मासळी थाळी उपलब्ध आहे. मासळी थाळीतही पापलेट, सुरमई, कोलंबी थाळी असे पर्याय आहेत.


कुठे : शॉप नंबर ६, आदिनाथ टॉवर-बी, नॅन्सी कॉलनी, बोरिवली

वेळ : सकाळी ११.३० ते रात्री १२ पर्यंत



हेही वाचा

गल्ली बेल्ली: बोरीवली खाऊगल्ली भाग- २

महाराष्ट्राच्या पारंपरिक मिसळला मॅक्सीकन तडका




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा