Advertisement

आता आमदारही खेळणार फुटबॉल!


आता आमदारही खेळणार फुटबॉल!
SHARES

आता विधानसभा आणि विधानपरिषदेचे आमदारही फुटबॉल खेळणार आहेत. आता तुम्ही म्हणाल हे तर आमदार आहेत. जबाबदारी विसरून हे फुटबॉल कसे काय खेळू शकतात? पण कारणही तसेच आहे.

जागतिक फुटबॉल महासंघ (फिफा) ही 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात भारतात होणार आहे. विशेष म्हणजे भारतीय उपखंडामध्ये होणारी ही पहिली फिफाची विश्वचषक स्पर्धा आहे. या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण देशात क्रीडा संस्कृती रुजवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळेच राष्ट्रीय स्तरावर 'मिशन 11 मिलियन' हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

याच निमित्ताने सभापती 11 विरुद्ध अध्यक्ष 11 अशा या आमदार चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा विधिमंडळाच्या परिसरात खेळली जाईल. याबरोबरच प्रत्येक आमदारांनी आमदार निधीतून फुटबॉल स्पर्धा आयोजित कराव्यात, असे आवाहनही करण्यात येणार आहे.


महाराष्ट्रात मिशन 1 मिलियन

राष्ट्रीय स्तरावर 'मिशन 11 मिलियन' हा प्रकल्प तर, महाराष्ट्रात 'मिशन 1 मिलियन' हा फुटबॉल प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामुळे शाळांमधून जवळपास 10 लाखांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींना फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळेच 30 हजारांहून अधिक शाळांमध्ये सुमारे 1 लाख फुटबॉलचे वाटप करण्यात आले आहे. हे एक ऐतिहासिक मिशन असून 8 सप्टेंबर 2017 रोजी ते साकार होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र हे आनंदाचे क्रीडांगण बनेल, असा विश्वासही शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला. मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष विश्वजीत कदम, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष छत्रपती मालोजी राजे भोसले, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार आदी उपस्थित होते.

शाळांसोबतच महाविद्यालये आणि विविध विद्यापीठांत फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात येईल. याचबरोबर जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा आणि क्रीडा क्षेत्रातील करीअर याबाबतही जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेच्या धर्तीवर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय फुटबॉल प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत, अशी माहितीही तावडे यांनी दिली.हेही वाचा -

'या' पालिका कर्मचाऱ्याची बातच काही और!

'फिफा विश्वचषक' स्पर्धेने मिळेल भारतीय फुटबॉलला प्रोत्साहन


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा