जुलै महिन्यात हेपेटायटिस 'ए, ई' चे 128 रुग्ण

  Mumbai
  जुलै महिन्यात हेपेटायटिस 'ए, ई' चे 128 रुग्ण
  मुंबई  -  

  हेपेटाटिस म्हणजे कावीळ. हा आजार म्हणजे यकृताचा आजार. त्यामुळे जगात होणाऱ्या सर्वात जास्त मृत्यूचं कारण हे यकृताचे आजार आहे. 28 जुलै हा जागतिक हेपेटायटिस दिन म्हणून घोषित केला आहे. त्याच्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार फक्त जुलै महिन्यातील 26 तारखेपर्यंत मुंबईत 128 हेपेटायटिसच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ही आकडेवारी हेपेटायटिस ‘ए’ आणि ‘ई’ ची असल्याचेही महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.


  ही आकडेवारी हेपेटायटिस ‘ए’ आणि ‘ई’ची आहे. या वातावरणात, या दोन जंतूंचा संसर्ग होतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. हेपेटायटिस ए आणि ईचा सर्वात जास्त परिणाम हा गर्भवती महिला आणि मुलांवर होतो.

  - डॉ. पद्मजा केसकर, मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका


  3 वर्षात हेपेटायसिस ‘ए’ आणि ‘ई’ मुळे झालेले मृत्यू

  मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार 2014 - 2015 साली मुंबईत एकूण 319 मातांचे मृत्यू झाले होते. त्यामध्ये 42 मृत्यू हे हेपेटायटिस ‘ए’ आणि ‘ई’मुळे झाले होते. 2015-16 मध्ये एकूण 311 मातांच्या मृत्यू पैकी 44 मृत्यू हेपेटायटिस ‘ए’ आणि ‘ई’मुळे झाले होते. तर डिसेंबर 2016 पर्यंत एकूण 237 मातांच्या मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील 49 हे हेपेटायटिस ‘ए’ आणि ‘ई’मुळे झाले असल्याचे समोर आले होते.

  वरील आकडेवारीनुसार मागील 3 वर्षांमध्ये 135 गर्भवती स्त्रियांचा हेपेटायसिस ए आणि ई मुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर, फक्त जुलै महिन्याच्या 26 तारखेपर्यंत 128 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.


  गर्भवती स्त्रियांना हेपेटायटिस ‘ए’ आणि ‘ई’चा जास्त धोका असतो. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात जास्त काळजी घ्यायला हवी. काहीही खाण्याच्या आधी त्यांनी हात धुवायला हवे तसेच, बाहेरचे पदार्थ खाणे टाळायला हवे. हा यकृताचा आजार असल्याकारणाने त्यांनी जास्त काळजी घ्यायला हवी.

  - डॉ. गौरी गोरे, स्त्रिरोगतज्ज्ञ

  हेपेटायसिसमध्ये ए, बी, सी, डी आणि ई असे प्रकार असतात. ज्यात हेपेटायसिस ‘सी’ हा लैंगिक संक्रमणातून होतो असे आता स्पष्ट झाले आहे. ज्या व्यक्ती यकृत (लिव्हर) प्रत्यारोपणासाठी येतात त्यापैकी 20 टक्के लोकांना लैंगिक संक्रमणामुळे हेपेटायटिस‘ ‘सी’ची लागण झालेली आढळते असे ग्लोबल हॉस्पिटलचे लिव्हर ट्रान्सप्लान्ट सर्जन डॉ. रवी मोहंका सांगतात.


  वेळेवर निदान होणे आवश्यक

  हेपेटायटिस ‘सी’ सर्वसाधारण संसर्गजन्य आजार आहे. रक्ताचा विषाणू आहे. त्यामुळे असुरक्षित इंजेक्शन आणि दूषित रक्तातून पसरतो. जगात 71 दशलक्ष लोक हेपेटायटिस ‘सी’ने संक्रमित झालेत. अधिक काळ याचे संक्रमण राहिल्यास सिरॉयसिस आणि लिव्हर कॅन्सर होण्याची शक्यता असते. अँटिव्हायरल औषधे हेपेटायटिस ‘सी’च्या संक्रमित 95 टक्के लोकांना उपयुक्त ठरतात. त्यामुळे लिव्हर कॅन्सर, सिरॉयसिस यांच्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होते. पण, फार कमी लोकांचे वेळेवर निदान होते. हेपेटायटिस ‘सी’साठी सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. याबाबतीत अजूनही संशोधन सुरू आहे. त्यामुळे या आजाराविषयी माहिती असणे, किंवा आजार होऊ नये म्हणून काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे.

  ‘डब्लूएचओ’ चा अहवाल

  भारतात सहा ते बारा दशलक्ष लोकं हेपेटायटिस ‘सी’ने बाधित आहेत. हेपेटायटिस ‘सी’ रक्तजन्य आजारातून पसरतो. लैंगिक संक्रमण त्यापैकी एक आहे. मात्र, हेपेटायटिस ‘सी’चे संक्रमण झालेल्या व्यक्तीद्वारे स्तनपान केल्यास, एकत्र अन्न घेतल्याने, पाणी प्यायल्यामुळे हा आजार पसरत नाही.


  हेपेटायसिस ‘बी’मुळेही होतो यकृताचा कर्करोग –

  हेपेटायटिस ‘बी’ वाढल्यास सिरोसिस, यकृताचा कर्करोग होऊ शकतो. यामुळे जीवाला धोका होऊ शकतो. डब्लूएचओच्या अहवालानुसार हेपेटायटिस ‘बी’चे विषाणू उपचारानंतर पूर्णपणे नष्ट होत नाहीत, ते परतू शकतात. त्यामुळे हेपेटायटिस ‘बी’वरील उपचार काहीवेळा संपूर्ण जीवनभर घ्यावे लागतात. हेपेटायटिस ‘बी’पासून वाचण्यासाठी तो होऊ न देणे हाच उपाय आहे. म्हणूनच हेपेटायटिस ‘बी’वरील लस ‘हेप बी’ घेणे जास्त फायद्याचे आहे.

  हेपेटायटिस ‘बी’चा विषाणूसुद्धा रक्तातून पसरतो. तसेच शरीरातील द्रवपदार्थ जसे लाळ, मासिकस्राव, योनीमार्गातूनही हेपेटायटिस ‘बी’चा विषाणू पसरत जातो. लैंगिक संक्रमणाद्वारेही हेपेटायटिस ‘बी’ पसरू शकतो.  हे ही वाचा -

  कावीळ झाल्यास अशी घ्या काळजी...   

  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.