Advertisement

कावीळ झाल्यास अशी घ्या काळजी...


कावीळ झाल्यास अशी घ्या काळजी...
SHARES

हेपेटायटिस म्हणजेच कावीळ हा यकृत (लिव्हर)चा आजार आहे. मुंबईसह महाराष्ट्रात हा आजार चिंतेचा विषय ठरत आहे. सर्वाधिक मृत्यूच्या कारणांमध्ये यकृताचा आजार हे तिसरे कारण ठरत आहे. या आजाराने प्रत्येक 30 ते 40 सेंकदाला एका व्यक्तीचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

भारतामध्ये हृदयरोग आणि कर्करोग या दोन आजारांचा पगडा खोलवर रुजला आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील पाचशेहून अधिक कार्य करणाऱ्या आणि अनेक रोगांना दूर ठेवणाऱ्या यकृताच्या आजाराबद्दल अजूनही तितकीशी जागरुकता आलेली दिसत नाही.


हेपेटायटिस म्हणजे काय ?

  • हेपेटायटिस (कावीळ ) म्हणजे लिव्हरला आलेली सूज
  • लिव्हरला झालेला संसर्ग
  • हेपेटायटिस ए, हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी, हेपेटायटिस ई हे त्याचे सर्वसाधारण प्रकार
  • हेपेटायटिस ए आणि हेपेटायटिस ई हे व्हायरस
  • हे व्हायरस दूषित पाणी वा दूषित अन्नातून आपल्या पोटात जातात. यकृतावर परिणाम होतो


कावीळबद्दल भारतामध्ये बरेच गैरसमज आहेत. माळ बांधणे आणि कावीळ उतरण्याचा या रोगाशी काहीएक संबंध नाही. कावीळ उतरवण्याच्या गैरसमजातून अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.

जागतिक हेपेटायटिस दिनानिमित्त मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये एक कार्यशाळा घेण्यात आली. त्यात मिळालेल्या माहितीनुसार कावीळबाबत लोकांचे अनेक गैरसमज असल्याचे समोर आले. पण, हे गैरसमज दूर होऊन त्यातून मार्ग काढणे सर्वात महत्त्वाचे आहे.


पावसाळा सुरू झाल्यावर गढूळ पाण्याचे प्रमाण वाढते आणि हे पाणी शरीरात गेल्यावर कावीळचे रुग्ण वाढू लागतात. कावीळ हा शब्द ऐकला की अनेक जणांची पावले झाडपाल्याच्या औषधांकडे वळतात. कारण काविळीला फक्त गावठी औषधच मारक असते हा गैरसमज अजूनही ग्रामीण आणि शहरी भागांमध्येही आढळून येतो.

- डॉ. अमित गुप्ते, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी आणि हेपेटोलॉजी सल्लागार


कावीळची लक्षणे

  • रुग्णास थकवा आणि ताप येणे
  • डोळे पिवळे होतात आणि लघवी पिवळसर लाल होते
  • यकृताला सूज येते
  • हिपेटायटिस ए हा सर्वसाधारणपणे लहान मुलांना होतो
  • पंधरा वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तींना हेपेटायटिस ई होतो

यकृताचा गंभीर आजार

यकृताचा गंभीर आजार हेपटायटिस ई व्हायरस(एचईव्ही)मुळे होतो, म्हणूनच कावीळचे योग्य निदान करणे गरजेचे आहे. याचबरोबर काही जन्मजात आजार यकृतावर परिणाम करतात आणि त्या व्यक्तीला वारंवार कावीळ होत असते. हेपेटायटिस बी, सी हे व्हायरस रक्तातून शरीरात शिरतात. त्यामुळे काही वर्षांनंतर त्यांचे यकृत खराब होऊन यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते.


कावीळ झाली की सर्वप्रथम हे करावे

  • कावीळचे निदान लवकरात लवकर होणे आवश्यक
  • योग्य वैद्यकीय उपचार घ्या
  • सर्वप्रथम दोष नाहीसा करा
  • पुन्हा कावीळ होणार नाही यासाठी प्रयत्न करा
  • कावीळमुळे कमी झालेली यकृताची ताकद वाढवा


काय काळजी घ्याल? 

  • पावसाळ्यात पाणी उकळून आणि गाळून प्या
  • बाहेर जाताना आणि सहलीच्या वेळीही पाण्याची बाटली घेऊन जा
  • बाहेरचे थंड पेय टाळा
  • शाळेमध्ये जाणाऱ्या लहान मुलांना बाटलीत उकळलेले पाणी द्या
  • मधुमेह, प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांनी बाहेरचे पाणी कटाक्षाने टाळा
  • मळमळ आणि उलट्या-जुलाब होत असल्यास उकळलेल्या पाण्यात मीठ-साखर टाकून प्या
  • पावसाळी दिवसात हात वारंवार धुऊन स्वच्छ ठेवा
  • कावीळ झाल्यास सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या


जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार आतापर्यंत जगातील 2 अब्ज लोक हेपेटायटिस या आजाराने बाधित झाले आहेत. जगातली प्रत्येक पंधरावी व्यक्ती या विषाणूने बाधित होत असते. जगभरात दरवर्षी 7 लाख नागरिक या रोगाच्या गंभीर दुष्परिणामामुळे मृत्युमुखी पडतात. हेपेटायटिसच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत भारत देश पहिल्या 10 मध्ये येत असून 4 ते 8 टक्के लोक दरवर्षी या विषाणूने बाधित होतात. मुंबईत 'ए' आणि 'ई' प्रकारच्या कावीळच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या कावीळच्या व्हायरसचा दूषित पाण्यातून प्रसार होतो, असे गेल्या 10 वर्षांच्या निरीक्षणांमधून सिद्ध झाले आहे.



हे देखील वाचा - 

उन्हाळ्यामुळे किडनी स्टोन आणि पोटाच्या विकारांमध्ये वाढ

'मधुमेह आणि रक्तदाब हे आजार कर्करोगापेक्षा भयंकर'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा