Advertisement

“महाराष्ट्रातील ‘या’ ७ जिल्हातील परिस्थिती होऊ शकते चिंताजनक”

महाराष्ट्रातील ७ जिल्हे असे आहेत, जिथं कोविड पाॅझिटिव्हीटी दर राज्याच्या दराच्या दुप्पट ते तिप्पट आहे.

“महाराष्ट्रातील ‘या’ ७ जिल्हातील परिस्थिती होऊ शकते चिंताजनक”
SHARES

राज्याचा कोविड पॉझिटिव्हिटी दर ०. १५ इतका कमी झाला आहे. ही बाब दिलासादायक असली, तरी महाराष्ट्रातील ७ जिल्हे असे आहेत, जिथं हाच पाॅझिटिव्हीटी दर राज्याच्या दुप्पट ते तिप्पट आहे. त्यामुळे या जिल्ह्यात नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची सक्त गरज असल्याचं मत तज्ज्ञांनी वर्तवलं आहे.

कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या ७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांची देखील उपस्थिती होती.

यावेळी, लेव्हल्सचा आधार घेऊन नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता सर्व व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते. यादृष्टीने आपल्या शहर अथवा जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करा आणि घाईघाईने व्यवहार खुले करू नका, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले.

काळजी घेण्याची गरज

तर, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी बोलताना सांगितलं की, महाराष्ट्रातील (maharashtra) या ७ जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंतेचा विषय बनू शकते. यातील ३ जिल्हे कोकण, ३ पश्चिम महाराष्ट्र आणि एक मराठवाड्यातील जिल्हा आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर चाचणी, तसंच ट्रेसिंग व लसीकरण करण्यावर भर दिला जाईल. या जिल्ह्यांना यासंदर्भात आवश्यक त्या सुविधाही पुरविण्यात येतील. आर चाचणी वाढविणं, वाड्यावस्त्यांमध्ये कंटेन्मेंट उपाययोजना अधिक काटेकोरपणे राबविणे याकडे सर्वांनीच लक्ष द्यावं, असं मुख्य सचिव म्हणाले.

हेही वाचा- घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, अजून डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका

यावेळी बोलताना टास्क फोर्सचे डॉ.संजय ओक आणि डॉ.शशांक जोशी यांनी सांगितलं की, या सातही जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. या विषाणूची लक्षणंही बदलत आहेत. लसीकरणाविषयी नागरिकांच्या मनातील भ्रामक कल्पना व समजुती काढून घेऊन त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणं खूप आवश्यक आहे. प्रसंगी अधिक कडक निर्बंधही लावावे लागणार आहेत.

याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली तसेच फिरत्या प्रयोगशाळा पुरविण्याची विनंती केली तसंच गावोगावी कोरोनामुक्तीसाठी (coronavirus) करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

प्रारंभी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी या सातही जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. राज्याचा पॉझिटिव्हिटी दर ०. १५ इतका कमी झाला आहे. मात्र या सातही जिल्ह्यांचा दर त्यापेक्षा  दुप्पट-तिप्पट आहे, असं सांगितलं. रत्नागिरीत पहिल्या लाटेत ३०७४ रुग्ण तर दुसऱ्या लाटेत ५६०० रुग्ण, सिंधुदुर्गात पहिल्या लाटेत १३४६ तर सध्या ५५००, हिंगोलीत पहिल्या लाटेत ६६० तर दुसऱ्या लाटेत ६७५ रुग्ण आढळले असून ही वाढ सावध करणारी आहे, असं ते म्हणाले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा