Advertisement

तिसऱ्या संभाव्य लाटेत फॅमिली डॉक्टर्सवर मोठी जबाबदारी

फॅमिली डॉक्टर्सनी काळजीपूर्वक तपासणी करताना कोविड लक्षणे ओळखून त्याप्रमाणे तत्काळ उपचार सुरु केल्यास वेळीच रुग्ण बरं होण्यास मदत होईल.

तिसऱ्या संभाव्य लाटेत फॅमिली डॉक्टर्सवर मोठी जबाबदारी
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील एका वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्य टास्क फोर्समधील तज्‍ज्ञ डॉक्टर्सनी मुंबईतील सुमारे ७०० खासगी डॉक्टर्सना कोरोनाबाबतीत वैद्यकीय उपचारांबाबत निश्चित काय पद्धती अवलंबवावी याविषयी एकाचवेळी मार्गदर्शन केलं.

याआधी ३ ते ४ दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने मुंबईतील सुमारे ३०० डॉक्टर्सशी संवाद साधण्यात आला होता. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या दोन्ही सभांमध्ये मिळून मुंबईतील (mumbai) सुमारे १ हजार डॉक्टर्सनी सहभाग घेतला होता. अशाच रितीने राज्यातील इतर विभागातील डॉक्टर्सशी देखील संवाद साधण्यात येणार आहे.

“माझा डॉक्टर” म्हणून रस्त्यावर उतरावं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यावेळी म्हणाले की, कोरोना काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे कारण कोणत्याही लहान मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या, परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण “माझा डॉक्टर” बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार आहे.

घरी उपचारातील रुग्णांकडे लक्ष हवं

लक्षणे नसलेले रुग्ण रुग्णालयात जातात आणि आवश्यक नसतानाही त्यांना बेड्स उपलब्ध करून दिले जातात. यामुळे खऱ्या गरजू रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. त्याचप्रमाणे कोविड रुग्ण उशिराने दवाखान्यात जात असल्याने योग्य उपचारांना उशीर होतो, त्यामुळे फॅमिली डॉक्टर्सनी काळजीपूर्वक तपासणी करताना कोविड लक्षणे ओळखून त्याप्रमाणे तत्काळ उपचार सुरु केल्यास वेळीच रुग्ण बरं होण्यास मदत होईल.

घरच्या घरी विलगीकरणातील रुग्णांकडे आपण सर्व डॉक्टर्सनी लक्ष देणे, त्यांची विचारपूस करीत राहणं गरजेचं आहे, त्यामुळे रुग्णाला मानसिक आधारही मिळतो आणि त्याची तब्येत खालावत असेल तर वेळीच त्याला रुग्णालयात दाखल करणं शक्य होतं. यासाठी सर्व डॉक्टर्सनी घरी उपचार घेणाऱ्या रुग्णाला प्रोटोकॉलप्रमाणे उपचार मिळताहेत किंवा नाही याकडे व्यक्तिश: लक्ष द्यावं तसंच वॉर्ड अधिकाऱ्यांना देखील योग्य ती माहिती वेळोवेळी दिल्यास रुग्णांच्या बाबतीत पुढील व्यवस्थापन करणं पालिकेला सोपं जाईल.

हेही वाचा- महाराष्ट्रातून ३२ लाख परप्रांतीय मजुरांनी धरला घरचा रस्ता!

कोविड उपचार केंद्रांमध्येही सेवा द्या

आपल्या परिसरातील कोविड उपचार केंद्र किंवा जम्बो केंद्रांना देखील आपल्या सेवेची गरज आहे हे लक्षात ठेवून खासगी डॉक्टर्सनी तिथंही आपली नावं नोंदवावी. राज्यात सर्वत्रच उपचार पद्धतीत एकवाक्यता असणं फार महत्त्वाचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

टास्क फोर्सकडून शंकांचं निरसन

स्टिरॉइड्सचा वापर किती प्रमाणात करावा, ६ मिनिटे वॉक टेस्टचं महत्त्व, ऑक्सिजनची गरज आहे ते नेमकं कसं ओळखावं, बुरशीमुळे होणाऱ्या ‘म्यूकर मायकॉसिस’मध्ये काय उपचार करावेत, ऑक्सिजन पातळी धोकादायक स्थितीत आहे म्हणजे नेमकं काय, रेमडेसिवीर कधी आणि किती वापरावे, व्हेंटिलेटरवरील रुग्णांची काळजी, रक्त शर्करा स्थिर राहण्याकडे कसं लक्ष द्यावं, कोविड झाल्यानंतरचा किती काळ देखरेख ठेवावी, कोविड झालेल्या रुग्णाने नेमकी कधी लस घ्यावी यावर मोलाचे मार्गदर्शन व शंका निरसन केले. आरटीपीसीआर चाचणीचे महत्त्व, सीटी स्कॅनची नेमकी किती गरज यावरही या सभेत मार्गदर्शन करण्यात आलं.

कोरोनाची (coronavirus) लक्षणं फसवी असतात, त्यामुळे येणारा प्रत्येक रुग्ण हा कोरोनाचा तर नसेल ना हा प्रश्न आपल्या मनात उपस्थित ठेवून त्याची तपासणी डॉक्टर्सनी करणे गरजेचं आहे, असंही यावेळी सांगण्यात आलं.

लहान मुलांकडे लक्ष ठेवा

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात ठेऊन राज्यात बालरोग तज्‍ज्ञांचा एक टास्क फोर्स निर्माण करण्यात येत आहे. याविषयी या सभेत माहिती देण्यात आली तसंच लहान मुलांच्या वर्तणुकीतील बदल, त्यांना होणारी सर्दी, ताप, डायरिया, दूध व अन्न खाणे कमी करणं किंवा बंद होणं अशा लक्षणांकडे लक्ष देणं गरजेचं आहे, असंही सांगण्यात आलं.

टास्क फोर्सच्या तज्‍ज्ञ डॉक्टर्सशी बोलण्याची थेट संधी मिळाल्याने अनेक शंकांचं निरसन झाले तसंच उपचार करण्यात अधिक आत्मविश्वास वाढल्याचंही डॉक्टर्स म्हणाले.

हेही वाचा- मुंबईत कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी वाढला, 'असा' आहे विभागवार कालावधी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा