SHARE

जुहू परिसरात राहणारा नि सुतारकाम करणाऱ्या एका २७ वर्षीय आसामी तरुणाचा महिन्याभरापूर्वी काम करताना करवत लागून पायाचा पूर्ण पंजा कापला गेला. पायापासून पूर्ण वेगळा झालेला आणि केवळ कातडीवरच पंजा तरला होता. अशा परिस्थितीत या तरुणाला कुपर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. केवळ कातडीवर तरलेला पंजा पाहता हा तरुण पुन्हा अपल्या पायावर उभा राहील, असं कुणालाही वाटलं नव्हतं.
पण कुपर हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांच्या हुशारीने चमत्कार घडवला. ६ तासांची प्लास्टिक सर्जरी करत डॉक्टरांनी पंजा जोडला. आज महिन्याभरानंतर हा तरुण आता लवकरच पुन्हा आपल्या पायावर उभा ठाकणार आहे.


शस्त्रक्रियेचा घेतला निर्णय

पालिकेच्या कूपर हॉस्पिटलमध्ये महिन्याभरापूर्वी करवतीने पंजा कापलेल्या या तरुणाला आणण्यात आलं. शरीराचा एखादा अवयव पूर्णतः कापला गेल्यास रक्त पुरवठा बंद होऊन शरीराचे इतर अवयव निकामी होऊ शकतात. ही परिस्थिती लक्षात घेत कूपरमधल्या प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. नितीन घाग आणि त्यांच्या टीमने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी रुग्णावर प्राथमिक उपचार करत शस्त्रक्रियेसाठी आवश्यक तपासण्या केल्या.


तरुणावर महिनाभर उपचार

या रुग्णावर प्लस्टिक सर्जरी करण्यात आली. सायंकाळी ८ वाजता शस्त्रक्रिया सुरू झाली आणि मध्यरात्री २ वाजता शस्त्रक्रिया पूर्ण झाली. ६ तासाच्या या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर महिनाभर उपचार करत त्याचा पंजा पुन्हा जोडण्याची कमाल डॉक्टरांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करून दाखवली आहे.


रुग्णाला डिस्चार्ज

या रुग्णाला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला असून तो आता लवकरच आपल्या पायावर उभा ठाकेल, अशी माहिती कुपरचे अधिष्ठाता डॉ गणेश शिंदे यांनी दिली आहे. या रुग्णाच्या कापलेल्या रक्तवाहिन्या जोडण्याचं आणि कातडी जोडण्याचं अवघड काम यशस्वीपणे डॉक्टरानी केलं. ही अशी मोठी आणि महागडी शस्त्रक्रिया पहिल्यांदाच पालिकेच्या रुग्णालयात झाली असून ही खूप मोठी उपलब्धी मानली जात आहे.


हेही वाचा - 

कुपर रुग्णालयात मिळणार दिव्यांगांना प्रमाणपत्र
संबंधित विषय
ताज्या बातम्या