Advertisement

कुपर रुग्णालयात मिळणार दिव्यांगांना प्रमाणपत्र

महापालिकेच्या रुग्णालयांमधून दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात याप्रकारचा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे आता दर बुधवारी येथील केंद्रात हे प्रमाणपत्र दिव्यांगांना उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

कुपर रुग्णालयात मिळणार दिव्यांगांना प्रमाणपत्र
SHARES

दिव्यांग व्यक्तींसाठी आतापर्यंत केवळ शासकीय रुग्णालयातूनच दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येते. परंतु, आता हे प्रमाणपत्र महापालिका रुग्णालयांमधून दिलं जाणार आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमधून दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात याप्रकारचा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे आता दर बुधवारी येथील केंद्रात हे प्रमाणपत्र दिव्यांगांना उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या विविध योजना आणि सोयी सुविधा यांचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे दिव्यांग प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. हे प्रमाणपत्र पूर्वी केवळ शासकीय रुग्णालयांद्वारेच देण्यात येत असे. मात्र, याबाबत महापालिका रुग्णालयांच्या स्तरावर देखील दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचे निर्देश राज्य शासनाद्वारे देण्यात आले आहेत.

यानुसार बृहन्मुंबई महापालिकेच्या "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रु. न. कूपर सर्वोपचार रुग्णालय" येथील मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर असणाऱ्या नोंदणी कक्षांच्या बाजूला 'दिव्यांग प्रमाणपत्र केंद्र' सुरू करण्यात आले आहे.

"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रु. न. कूपर सर्वोपचार रुग्णालय" हे ९४० खाटांचे बृहन्मुंबई महापालिकेचे प्रमुख रुग्णालय जुहू विलेपार्ले (पश्चिम) परिसरात आहे. याच रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र केंद्रांचे उद्घाटन दोन दिव्यांग व्यक्तींच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे.

सुरुवातीला दर बुधवारी सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत सुरू राहणाऱ्या या केंद्रामुळे मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना 'दिव्यांग प्रमाणपत्र' मिळवणे अधिक सुविधाजनक होणार आहे. ही सुविधा दिव्यांग व्यक्तींना मोफत स्वरुपात उपलब्ध असेल, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी दिली आहे.


यांनाच दिव्यांगाचं प्रमाणपत्र

दिव्यांग प्रमाणपत्र केंद्राद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संबंधितांना विहीत नमुन्यात आणि आवश्यक अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडणेही गरजेचे आहे. यानंतर अर्जदारास आवश्यक त्या शारिरिक चाचण्यांसाठी तारीख आणि वेळ देण्यात येईल.

या चाचण्यांनुसार ज्या व्यक्तींची दिव्यांग टक्केवारी ४० टक्क्यांपेक्षा अधिक असेल, त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्रमाणपत्राच्या आधारे संबंधित व्यक्तीला दिव्यांगांसाठी असलेल्या शासकीय योजना आणि सोयी सुविधांचा लाभ घेता येऊ शकेल, अशीही माहिती डॉ. गणेश शिंदे यांनी दिली आहे.


हेही वाचा -

कुपर रुग्णालयात डॉक्टर, रुग्णांसाठी बससेवा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा