Advertisement

गोरेगावच्या नेस्को क्वारंटाईन सेंटरला मुख्यमंत्र्यांची भेट

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवार १५ मे रोजी सकाळी गोरेगाव येथील नेस्‍को मैदानावर उभारण्यात येत असलेल्या कोरोना काळजी केंद्र २ (CCC 2) व्यवस्थेची पाहणी केली.

गोरेगावच्या नेस्को क्वारंटाईन सेंटरला मुख्यमंत्र्यांची भेट
SHARES

येत्या काळात मुंबईत कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये मोठी वाढ होणार असल्याचं म्हटलं जात असल्याने महानगरपालिकेकडून ठिकठिकाणी क्वारंटाईन सेंटर्स उभारण्यात येत आहेत. मुंबईतील सर्वात मोठ्या एक्झिबिशन सेंटर्स पैकी एक असणाऱ्या गोरेगाव नेस्को मैदानात देखील याच पद्धतीने क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवार १५ मे रोजी सकाळी गोरेगाव येथील नेस्‍को मैदानावर उभारण्यात येत असलेल्या कोरोना काळजी केंद्र २ (CCC 2) व्यवस्थेची पाहणी केली. 

यावेळी त्यांच्यासोबत राज्‍याचे उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, सहआयुक्त (विशेष) आनंद वागराळकर, पी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास क्षीरसागर, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) श्री. विजय पाचपांडे, विशेष कार्य अधिकारी देवेंद्र जैन तसंच मिलिंद नार्वेकर हे यावेळी उपस्थित होते. 

हेही वाचा - मुंबईत ३१ मेपर्यंत कोरोनाग्रस्तांसाठी आणखी ३१०० बेड्स

मुख्यमंत्र्यांनी नेस्‍को मैदानावरील सभागृह क्रमांक २ व ३ येथील व्‍यवस्‍थेची प्रामुख्‍याने पाहणी केली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांना नेस्को केंद्रावर करण्यात येत असलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली.

नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये ५ मोठे एक्झिबिशन हॉल आहेत. या सर्व हॉलचं रूपांतर आता क्वारंटाईन कक्षात करण्यात येतं आहे. हे संपूर्ण केंद्र एकूण १,२४० बेड क्षमतेचं असणार आहे. याठिकाणी ऑक्सिजन पुरवठादेखील उपलब्ध असेल. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि स्नानगृहे, गिझर यासह प्रत्येक बेडला स्वतंत्र पंखा दिला जाणार आहेत. इथे ठेवण्यात येणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या नातलगांना त्रास होऊ नये म्हणून इथं विविध हेल्पडेस्क देखील बनवण्यात येत आहेत. ज्यामध्ये चौकशी कक्ष,  सॅनिटायझेशन कक्ष, मेडिकल चेकअप असे विविध कक्ष असतील. याठिकाणी पुरेसे वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका नेमण्यात येणार आहेत. संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या तयारीबाबत समाधान व्यक्त केलं.

हेही वाचा - कोरोना पॅकेज टीव्ही सिरियल आहे का? रोज पत्रकार परिषदा कशासाठी??- अशोक चव्हाण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा