धारावीत कोरोनाचे १५ नवीन रुग्ण तर मुंबईचं मध्यवर्ती केंद्र असलेल्या दादरमध्ये कोरोनाचे २ नवीन रुग्ण रविवारी आढळून आले आहेत. यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४३ आणि दादरमधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३ वर पोहोचली आहे.
इथं सापडले रुग्ण
धारावीत सापडलेल्या १५ नव्या कोरोना रुग्णांपैकी ९ जणांना आधीच राजीव गांधी क्वॉरंटाइन केंद्रात ठेवण्यात आलं होतं. तिथं या सर्वांवर उपचार सुरू आहेत. कोरोना पाॅझिटिव्ह निघालेले हे सर्व नवीन रुग्ण धारावीतील सोशल नगरमध्ये दगावलेल्या आणि मदिना नगरमधील करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. तसंच केईएममधील कर्मचाऱ्यांच्याही संपर्कात हे रुग्ण आले होते. तर उरलेल्या ६ नवीन कोरोना रुग्णांपैकी ४ जण हे सोशल नगरजवळच्या शास्त्रीनगर येथील रहिवासी आहेत आणि २ जण जनता हाऊसिंग सोसायटीमधील रहिवासी आहेत. या १५ नव्या रुग्णांमध्ये एका २० आणि २४ वर्षांच्या तरुणीचा समावेश आहे. तर इतर पुरुष हे १८ ते ६६ वयोगटातील आहेत.
हेही वाचा - Coronavirus Updates: मुंबईत २४ तासांत १८९ कोरोना रुग्ण, तर ११ जण दगावले
महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1895 झाली आहे. यामध्ये बृहन्मुंबई 113, रायगड 01, अमरावती 01, पुणे 04, मीरा-भाईंदर 07, नवी मुंबई 02, ठाणे परिसर 02, भिवंडी 01, वसई विरार 02, पिंपरी चिंचवड 01 असे 134 नवीन कोरोना बाधित रुग्ण दाखल झाले आहेत.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 12, 2020
कृती आराखडा
धारावी ही अत्यंत दाटीवाटीची झोपडपट्टी असल्याने या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढल्यास त्याला रोखणं कठिण होऊ शकतं, याची प्रशासनाला पुरेपूर जाणीव असल्याने धारावीसाठी प्रशासनाने विशेष कृती आराखडा तयार केला आहे.
या कृती आराखड्यानुसार धारावीत २१ प्रतिबंधित आणि ५ धोकादायक भाग निश्चित करण्यात आले आहेत. धारावीतील कल्याणवाडी, मुकुंद नगर, सोशल नगर, मुस्लीम नगर, मदिना नगर या ५ भागांमध्ये प्रामुख्याने कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने महापालिका, आरोग्य विभागाची पथके या परिसरातील घराघरांत जाऊन रहिवाशांची ताप, कफ आदींबाबत तपासणी करत आहेत. त्यानंतर कोरोनाची लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्तीला तात्काळ विलगीकरण केंद्रात किंवा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.
Maharashtra: 15 new #Coronavirus positive cases have been reported in Dharavi area of Mumbai. A total of 43 cases and 4 deaths have been reported here so far.
— ANI (@ANI) April 12, 2020
दादरमध्येही २ नवे रुग्ण
दादरच्या कामगार स्टेडियमजवळील आंबेडकर नगरमध्ये एका ५२ वर्षीय महिलेला आणि कासारवाडी येथील पालिका कर्मचारी वसाहतीतील ४८ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचं चाचणीत स्पष्ट झालं आहे. त्यामुळे हे दोन्ही परिसर सील करण्यात आले आहेत. या २ नव्या रुग्णांमुळे दादरमधील कोरोना रुग्णांची संख्या १३वर गेली आहे. दादरमध्ये दिनकर अपार्टमेंट, सौभाग्य अपार्टमेंट, कासरवाडी आणि आंबेडकर नगरमध्ये प्रत्येकी एक, तावडेवाडीमध्ये ५, सुश्रुषा हॉस्पिटल आणि केळकर रोडवर प्रत्येकी २ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.
हेही वाचा - Coronavirus Updates: एकट्या मुंबईत कोरोनाचे ६१ टक्के रुग्ण