Advertisement

वाढत्या कोरोनामुळं पुन्हा 'धारावी पॅटर्न' सुरू


वाढत्या कोरोनामुळं पुन्हा 'धारावी पॅटर्न' सुरू
SHARES

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने कोरोनाकाळात चर्चेचा विषय ठरलेल्या धारावीत आतापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. दिवसाला शुन्य आणि एक असा बाधितांचा आकडा असलेल्या धारावीत पुन्हा १२ ते १५ रुग्ण दिवसाअखेरीस आढळत आहेत. गतवर्षी हा धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. त्यामुळं पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.

बेशिस्तपणे वावरणाऱ्यांविरुद्ध कारवाई, घरोघरी जाऊन तपासणी, पोलिसी धाक अशा उपाययोजनांचा 'धारावी पटर्न' पुन्हा एकदा राबवला जात आहे. लॉकडाऊनच्या काळात वाढत्या रुग्णांमुळे स्मशानशांतता अनुभवलेली धारावी आता पूर्वपदावर आली आहे. उद्योग व्यवसाय सुरळीत झाल्याने बाजारपेठांमध्येही गर्दीचे वातावरण आहे. पण या गर्दीत प्रकर्षांने जाणवते ती बेशिस्त. याच बेशिस्तपणामुळे धारावीत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे.

महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दिवसाला शून्य आणि एक अशी बाधितांची संख्या होती, जी आता दहा ते बाराच्या घरात पोहोचली आहे. महिनाभरापूर्वी दादर येथील वनिता समाज कोविड सेंटरमध्ये ३ ते ४ रुग्ण असायचे. आता ती संख्या आता १०० वर येऊन पोहोचली आहे. हा आकडा झपाट्याने वाढू नये यासाठी पालिकेसोबतच पोलीस यंत्रणाही कामाला लागली आहे.

पूर्वी लोकांचे विलगीकरण करून मग करोना चाचणी केली जात होती. सध्या प्रत्येकापुढे पोटापाण्याचा प्रश्न असल्याने लोक विलगीकरणासाठी तयार होत नाहीत. त्यामुळे थेट चाचणी करण्यावर भर दिला जात आहे. जेणेकरून संसर्गाला आळा बसेल. ठिकठिकाणी क्लीन अप मार्शलही तैनात केले आहेत. प्रत्येक विभागात गस्त, स्थानिक प्रतिनिधींना जनजागृतीचे आव्हान, बाजारातील गर्दीवर नियंत्रण, मुखपट्टीविना फिरणाऱ्यांवर कारवाई या माध्यमातून पोलीस प्रशासनानेही नागरिकांना शिस्त लावण्याचा विडा उचलला आहे.

जी उत्तर विभागात एकूण ११ आरोग्य केंद्रे आहेत. त्यापैकी नऊ धारावीत आहेत. त्या सर्व केंद्रांवर सध्या करोना तपासणी सुरू केली आहे. या व्यतिरिक्त मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून आणि घरोघरी जाऊन डॉक्टर तपसणी करीत आहेत. एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील २० ते २५ व्यक्तींची करोना चाचणी केली जात आहे.

पोलिसही प्रत्येक विभागात जाऊन दखल घेत आहे. २ दिवसांपूर्वी टी-जंक्शन परिसरात एका तासात मुखपट्टीविना फिरणाऱ्या ९० लोकांवर कारवाई केली. विभागवार स्थानिक प्रतिनिधी, गणेशोत्सव मंडळे यांना जनजागृतीचे आणि आपापल्या विभागात सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. पोलीस ठाण्याच्या वतीने काही खासगी रुग्णालयांतील डॉक्टरना तपासणीसाठी बोलावण्यात येते. बाजारापेठांमध्ये स्थानिकांशिवाय बाहेरून येणाऱ्यांवर र्निबध घातले आहेत. गर्दी नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा