Advertisement

वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात कोविड लसीकरण जम्बो सेंटर सुरू

नवी मुंबई पालिकेने ३१ जुलैपर्यंत पालिका क्षेत्रातील ४५ वर्षांवरील १०० टक्के व्यक्तींना कोव्हीड लसीचा किमान एक डोस देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.

वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात कोविड लसीकरण जम्बो सेंटर सुरू
SHARES

वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात विशेष जम्बो लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलं आहे. याठिकाणी दररोज १००० व्यक्तींना लसीकरण करण्याची क्षमता आहे.  नाट्यगृहातील मंचावर लसीकरण बूथ व प्रेक्षागृहातील आसनांच्या ठिकाणी प्रतिक्षा आणि निरीक्षण कक्षाची रचना करण्यात आलेली आहे.

नवी मुंबई पालिकेने ३१ जुलैपर्यंत पालिका क्षेत्रातील ४५ वर्षांवरील १०० टक्के व्यक्तींना कोव्हीड लसीचा किमान एक डोस देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. त्यासाठी लसीकरण केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.

सद्यस्थितीत लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असला तरी लसी उपलब्ध झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये व लसीकरणाची कार्यवाही लगेच सुरू करता यावी यावर आयुक्तांचा विशेष भर असून त्यादृष्टीने नागरिकांना सुविधाजनक नवीन लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येत आहेत.

सध्या महानगरपालिकेची वाशी, नेरूळ व ऐरोली ही ३ रुग्णालये, तुर्भे माता बाल रूग्णालय, २३ नागरी आरोग्य केंद्रे त्याचप्रमाणे एपीएमसी दाणा बाजार येथील ग्रोमा सेंटर, जुईनगर रेल्वे कॉलनी हेल्थ युनीट तसेच इनॉर्बिट मॉल वाशी व ग्रॅंड सेंट्रल मॉल सीवूड नेरूळ या दोन्ही मॉलमधील ड्राइव्ह इन लसीकरण आणि सेक्टर ५ वाशी येथील ईएसआयएस रूग्णालयातील जम्बो लसीकरण केंद्र अशा ३२ ठिकाणी लसीकरण केले जात आहे. त्यामध्ये आता विष्णुदास भावे नाट्यगृहातील जम्बो लसीकरण केंद्राची भर पडलेली आहे. याशिवाय लसीकरण केंद्रात आणखी वाढ करण्याच्या दृष्टीने विविध विभागांत ५० समाजमंदिरे, शाळांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन  करण्यात आलेले आहे.  

संपूर्ण वातानुकूलीत असलेले विष्णुदास भावे नाट्यगृहातील लसीकरण केंद्र सर्व सुविधांनी परिपूर्ण असून इतर लसीकरण केंद्रांवरही मे महिन्यातील उन्हाळा लक्षात घेता तसेच सध्या तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर पडलेला पाऊस आणि आगामी पावसाळी कालावधीचा अंदाज घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी मंडप घालण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे त्याठिकाणी खुर्च्या आणि पंख्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत २ लाख ५७ हजार ८०८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामधील ९२ हजार ७३६ नागरिकांनी लसीचा दुसराही डोस घेतला आहे. म्हणजेच एकूण ३ लाख ५० हजार ५४४  लसीचे डोस देण्यात आलेले आहेत. कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सीन यापैकी ज्या लसीचा पहिला डोस घेतला त्याच लसीचा दुसरा डोस घेणे गरजेचे असल्याने याही बाबीकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्रांवर दोन्ही लसींच्या नोंदणीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानुसार ज्या लसीचा साठा ज्या प्रमाणात उपलब्ध होईल त्यानुसार लसीकरणाचे नियोजन करण्यात येत आहे.



हेही वाचा -

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 'इतक्या' दिवसांचा पाणीसाठा शिल्लक

Tauktae Cyclone: नौदलाचे शोधकार्य अद्याप सुरूच; २६ बेपत्ता, ४९ मृतदेह हाती

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा