आधी कोंबडी कि आधी अंड हे कोडे सर्वांना माहित आहे. पण आता या कोंबडीच्या अंड्यावरून देशभरातील ग्राहकांना एक अजून कोडे पडले आहे आणि ते म्हणजे प्लास्टिकच्या अंड्याचे. मुंबईसह देशभर सध्या एकच चर्चा सुरू आहे ती प्लास्टिकच्या अंड्याची. बाजारात प्लास्टिकची अंडी विक्रीसाठी आली असून, ही अंडी आरोग्यास घातक ठरू शकतात अशी चर्चा असल्याने ग्राहक साहजिकच कोड्यात पडलेत. खरंच प्लास्टिकची अंडी असतील का? त्यामुळेच 'मुंबई लाइव्ह'ने खरेच प्लास्टिकची अंडी विक्रीस आली आहेत का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. याचा अंडे विक्रेत्यांसह अन्न आणि औषध प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता प्लास्टिकची अंडी असूच शकत नाही असा ठोस दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे ग्राहकांनो अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे घाबरून जाऊ नका असे आवाहन एफडीएने 'मुंबई लाइव्ह'च्या माध्यमातून ग्राहकांना केले आहे.
मुंबईतील अंड्याचे नमुने घेण्यास सुरूवात
कोलकता, केरळ आणि डोंबिवलीतील बाजारात प्लास्टिकची अंडी विक्रीस येत असल्याची जोरदार चर्चा आहे. मुंबईतही प्लास्टिक-कृत्रिम वा चिनी अंड्याचे लोन पसरले असून, डोंबिवलीत प्लास्टिकचे अंडे असल्याची चर्चा कानावर आल्यावर एफडीएचे अधिकारी कामाला लागले आहेत. मुळात प्लास्टिकची अंडी असूच शकत नाही असा दावा एफडीएचे सहाय्यक आयुक्त (अन्न) बृहन्मुंबई, सुरेश अन्नपुरे यांनी केला आहे. मात्र प्लास्टिक अंडयाची जोरदार चर्चा असल्याने ग्राहकांच्या हिताच्यादृष्टीने मुंबईतील बाजारातील अंड्यांची तपासणी करण्याचे आदेश शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार अंड्याचे नमुने घेत ते तपासणीसाठी पाठवण्यात येतील आणि त्यानंतरच काय ते समोर येईल, असेही अन्नपुरे यांनी स्पष्ट केले आहे.
प्लास्टिक-कृत्रिम नाही तर खराब अंडी
बाजारात ग्राहकांना खाण्यासाठी म्हणून कोंबडीच्याच अंड्यांची विक्री केली जाते. बऱ्याचदा कोंबडीच्या अंड्याच्या जागी बदकाची वा इतर अंडी देऊन ग्राहकांची फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी अंडी खरेदी करताना थोडी काळजी घ्यावी. महत्त्वाचे म्हणजे प्लास्टिकची अंडी यावर आमचा विश्वासच नाही, पण त्यातही अंडी चांगली आहेत का याची पडताळणी करून घेणे ग्राहकांसाठी गरजेचे असल्याची माहिती इडन एग्जचे मालक स्टॅनी देविदास यांनी दिली. 20 दिवसांपूर्वीचीच अंडी खाण्यायोग्य असतात. त्यामुळे अंडी खरेदी केल्यानंतर अंडी पाण्यावर तरंगतात की बुडतात हे पहावे. अंडी तरंगली तर ती चांगली. तसेच अंड्याचा वास आणि चव यावरही लक्ष ठेवावे, असेही स्टॅनी यांनी सांगितले आहे. तर एफडीएनेही अंडी खराब असण्याची शक्यता दाट असल्याने ग्राहकांना वेगवेगळे अनुभव येत असल्याचेही स्पष्ट करत अंडी खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी असे स्पष्ट केले आहे.
प्लास्टिक-कृत्रिम अंडी तयार केली तर विकणार कशी?
विविध रसायनांचा वापर करत कृत्रिम प्लास्टिकची अंडी तयार करता येतील. पण ही अंडी नक्कीच खाण्यासाठी नसतील. त्यातही अशी अंडी तयार करण्यासाठी मोठी यंत्र सामग्री लागेल आणि एवढी यंत्रसामग्री वापरून अंडी तयार केली त्याची किंमत फार असेल. अशी महाग अंडी कशी आणि कुठे विकणार असा सवाल स्टॅनी यांच्यासह अन्नपुरे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे खराब अंडी विकली जाताहेत का आणि अशा खराब अंड्यांमुळे आरोग्यावर घातक परिणाम होताहेत का, याचा तपास आता एफडीए करणार आहे.
प्लास्टिक वा कृत्रिम अंड्यांची चर्चा सुरू असल्याने अनेकांना प्रश्न पडला असेल की प्लास्टिक अंडी म्हणजे नेमके काय? आणि ते ओळखायचे कसे. मुळात प्लास्टिक अंडी नसल्याचा दावा एफडीए आणि तज्ज्ञ करत असले तरी वाचकांसाठी, ग्राहकांसाठी सोशल मीडियावर वायरल होणारी ही माहिती.
जिलेटीन, अॅल्यूमिनियम, कॅल्शियम आणि सोडियम एल्गिनाईसारख्या रसायनांचा वापर करत प्लास्टिकची अंडी तयार केली जातात. या अंड्याचा वास वेगळा असतो. अशा अंड्याचे कवच जळता जळत नाही. प्लास्टिक अंड्याचा आतील पिवळा भाग अधिक गडद असतो तर बाहेरचा भाग अधिक टणक असतो. हे अंडे तव्यावर टाकल्याबरोबर पसरत नाही. अशी अंडी खाल्यास अंगावर पुरळ येण्याबरोबर उल्टी आणि पोटदुखीसारखे त्रास होतात.