Advertisement

सिगारेट, तंबाखूच्या पॅकेटवर आता 'क्विट लाइन' हेल्पलाईन नंबर


सिगारेट, तंबाखूच्या पॅकेटवर आता 'क्विट लाइन' हेल्पलाईन नंबर
SHARES

तंबाखू आणि सिगारेटच्या पॅकेटवर यापुढे व्यसन सोडवण्यासाठी मदत करणारा क्विट हेल्पलाईन नंबर छापण्यात येणार आहे. कारण आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ३ एप्रिल २൦१८ ला जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, प्रत्येक सिगारेटच्या पॅकेटवरील ८५ टक्के जागा सावधगिरी बाळगणाऱ्या जाहिरातीला देणे बंधनकारक आहे. ज्यात कर्करोगग्रस्ताचे चित्र, संदेश आणि हेल्पलाईन नंबर असेल. त्यानुसार हेल्पलाईन नंबरचा निर्णय येत्या १ सप्टेंबर २൦१८ पासून लागू करण्यात येणार आहे. ज्यात चित्रासोबत संदेश आणि हेल्पलाईन नंबरचा समावेश असेल. सरकारच्या या निर्णयाचं डॉक्टरांनी स्वागत केलं आहे.


हा असेल हेल्पलाईन नंबर...

१८००-११-२३५६ या टोल-फ्री नंबरवर फोन करून तुम्ही व्यसनमुक्तीसाठी मदत मागू शकता. शिवाय, पॅकेटवर तंबाखूमुळे कर्करोग होतो आणि त्यामुळे मृत्यू ओढवतो हे वाक्य पॅकेटवर मोठ्या अक्षरात लिहिण्यात येणार आहे.


काय सांगते आकडेवारी?

० तंबाखूच्या सेवनाने भारतात दरवर्षी १० लाख लोकांचा मृत्यू
० भारतात २६.७ कोटी लोकं तंबाखूचं सेवन करतात
० ५ हजार ५०० लहान मुलांना दररोज तंबाखूचं व्यसन लागतं
० चालू वर्षात १५ ते १७ वयोगटातील अल्पवयीन मुलांमध्ये सिगारेटचं सेवन ५.५ टक्क्यांनी वाढलं

गॅट्स या संस्थेने २൦१७ मध्ये जागतिक पातळीवर असाच एक प्रयोग केला होता. त्या सर्वेक्षणानुसार, ६२ टक्के लोकांना सिगारेटचं सेवन, ५४ टक्के लोकांना बिडीचं सेवन आणि ४६ टक्के लोकांना तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन सोडायचं आहे.


तंबाखूमुळे दरवर्षी १२ लाख मृत्यू

मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील कर्करोग सर्जन आणि प्राध्यापक डॉ. पंकज चतुर्वेदी यांच्या मते, तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी बारा लाख मृत्यू होतात. त्यापैकी जवळजवळ ४൦ टक्के नॉन कम्युनिकेबल (एनसीडी) कॅन्सर, कार्डिओ व्हॅस्क्युलर रोग आणि फुफ्फुसाचे विकार हे तंबाखूच्या थेट वापरामुळे होतात. भारतात तंबाखूमुळे ५൦ टक्के कर्करोग होण्याचं प्रमाण आहे. ९८ टक्के तोंडाचे कर्करोग हे तंबाखूमुळे होतात.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा आहे. यामुळे सिगारेट आणि तंबाखूचं व्यसन असणाऱ्यांची व्यसनमुक्तीकडे वाटचाल सुरू होईल. तंबाखू सोडण्यासाठी सरकारने एक हेल्पलाइन बनवलीये. या हेल्पलाइनवर नागरिकांना मोफत सिगारेट सोडण्यासंबंधी माहिती मिळेल.

डॉ. पंकज चतुर्वेदी, कर्करोग सर्जन आणि प्राध्यापक, टाटा मेमोरियल हॉस्पिटलहेही वाचा

सुगंधित सुपारीवरील बंदी ६ महिन्यांसाठी कायम


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा