Advertisement

धारावीत स्वतंत्र लसीकरण केंद्र

मुंबईसह राज्याभरात लसीकरण केलं जात आहे. त्यानुसार, आता धारावीत लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी नवे प्रारूप तयार करण्यात येत आहे.

SHARES

गतवर्षी कोरोनानं मुंबईत प्रवेश केला असून, त्यावेळी धारावी हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र, महापालिकेच्या अथक प्रयत्नांनंतर धारावीतील कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली. त्यानंतर संपुर्ण जगात धारावीचं कौतुक करण्यात आलं असून, कोरोनाला हरवण्यासाठी 'धारावी पॅटर्न'चा वापर करण्यात आला. असं असलं तरी सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मुंबईत वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्याभरात लसीकरण केलं जात आहे. त्यानुसार, आता धारावीत लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी नवे प्रारूप तयार करण्यात येत आहे.

धारावीसाठी सोमवारपासून स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू होणार असून, एकाच दिवशी १००० नागरिकांना लस देण्याचं नियोजन करण्यात येत आहे. धारावीकरांना अ‍ॅपवर नोंदणीसाठी व डॉक्टरांच्या प्रमाणपत्रासाठी मदत करण्याकरिता खासगी डॉक्टरांची व स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. सध्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू असून, त्याकरिता धारावीतून अतिशय कमी संख्येनं लोक पुढे येत असल्याचं आढळून आलं. त्यामुळं येत्या सोमवारपासून धारावीतील नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू होणार आहे.

लसीकरणासाठी या वेळीही स्वयंसेवी संस्था व खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. धारावीत अशिक्षित वर्ग तुलनेनं अधिक आहे. त्यांना कोविन अ‍ॅपवर नोंदणी करण्याबाबत माहिती असेलच असं नाही. त्यामुळं स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन जागोजागी मदत केंद्र उभी करण्यात येणार आहेत. डॉक्टरांचं प्रमाणपत्र देण्यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणांतर्गत मिळालेल्या माहितीचा यात वापर केला जाणार असल्याचं समजतं.

धारावीतील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे दीड ते २ लाख लोक हे ४५ ते ६० वयोगटातील, सहव्याधी असलेले तसंच, ज्येष्ठ नागरिक असल्याचा पालिकेचा अंदाज आहे. यांचं लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्रावर ५ कक्ष उभे करण्यात येणार आहेत. एकाच वेळी ५ जणांना लस देता येणार आहे. दिवसाला १००० लोकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.



हेही वाचा -

राज्यात १२,५०० पोलिसांची भरती करणार, गृहमंत्र्यांची घोषणा

वाढत्या कोरोनामुळं दादरच्या बाजाराचे पुन्हा स्थलांतर?


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा