Advertisement

केडीएमसी करणार ४ लाख ७६ हजार घरांचं सर्वेक्षण

कल्याण डोंबिवली महापालिका (केडीएमसी) ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत विशेष मोहीम राबवणार आहे. कल्याण डोंबिवली कोरोनामुक्त करण्यासाठी या मोहिमेत ४ लाख ७६ हजार घरांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

केडीएमसी करणार ४ लाख ७६ हजार घरांचं सर्वेक्षण
SHARES

कल्याण डोंबिवली महापालिका (केडीएमसी) ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत विशेष मोहीम राबवणार आहे. कल्याण डोंबिवली कोरोनामुक्त करण्यासाठी या मोहिमेत ४ लाख ७६ हजार घरांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे.  २५ दिवसांत ४०० टीमच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण राज्यभरात  माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येत आहे. कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांसह सर्व लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्ष अशासकीय संस्थाच्या (एन.जी.ओ.) सहकार्याने व सहभागाने राबविण्यात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. कोविड नियंत्रणासाठी नवीन जीवनशैली पध्दतीचा अंगिकार करण्यासाठी अधिकाधिक व्यक्तिंना प्रेरीत करणे हा या मोहिमेचा मुख्य भाग आहे.

ही मोहिम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महापालिकेने ४०० पथकं तयार केली आहेत.प्रत्येक पथकात स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत देण्यात आलेले २ स्वयंसेवक व महापालिकेचा १ आरोग्य कर्मचारी यांचा समावेश असेल. हे पथक दररोज ५० घरांना भेटी देईल. मोहिमेच्या एकुण कालावधीत ही पथके कल्याण डोंबिवलीमधील प्रत्येक घरी दोन वेळा भेटी देतील. या भेटीमध्ये घरातील सर्व व्यक्तींना वैयक्तिक/ कौटुंबिक, सोसायटी व वसाहतीमध्ये वावरताना, दुकाने/ मंडया/मॉल्समध्ये खरेदी इ., कार्यस्थळी व कार्यालयांमध्ये घ्यावयाची खबरदारी तसेच खाजगी/सार्वजनिकरित्या प्रवास करतांना घ्यावयाची दक्षता या संदर्भात माहिती आणि मार्गदर्शन केलं जाणार आहे.

प्रथम फेरीतील १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत गृह भेटीमध्ये हे पथक घराच्या दरवाजाबाहेर स्टीकर लावेल. घरातील प्रत्येक सदस्यांची अॅपमध्ये नोंद करेल आणि घरातील सर्व सदस्यांचे तापमान व ऑक्सिजन पातळी, अती जोखमीचे व्यक्ती ओळखून त्यांना सेवा आणि उपचार दिले जातील. दुसऱ्या फेरीतील १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान प्रत्येक पथक ७५ ते १०० घरांना भेटी देतील आणि सर्वांचे तापमान व ऑक्सिजन पातळी तपासून घरातील कोणाला दरम्यानच्या काळात मोठा आजार होऊन गेला आहे काय, याची खात्री करतील. 

महानगरपालिकेमार्फत सर्व लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तसंच कोविडमुक्त कल्याण डोंबिवलीसह कोविडमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी महानगरपालिकेस आणि महापालिकेच्या पथकांना सर्व प्रकारची माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केलं आहे.



हेही वाचा -

२ पेक्षा अधिक मजल्यांवर कोरोना रुग्ण आढळल्यास इमारत सील

मुंबईच्या 'या' परिसरात कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा