Advertisement

मुंबई महानगरात १४ नवे ऑक्सिजन प्लांट उभारणार

ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४ प्लांट मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बसविण्यात येणार आहेत.

मुंबई महानगरात १४ नवे ऑक्सिजन प्लांट उभारणार
SHARES

ऑक्सिजनची  वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४ प्लांट मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बसविण्यात येणार आहेत. ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मिरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये हे प्लांट कार्यान्वित होतील, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी दिली.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सर्व कोविड उपचार केंद्रांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली आहे. त्यावर मात करतानाच भविष्यात अशा प्रकारचा तुटवडा जाणवू नये यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून रुग्णांना पुरविणाऱ्या प्लांटची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हेही वाचा- तर ते हवेतला आॅक्सिजन पण शिल्लक ठेवणार नाहीत, नितेश राणेंची पवारांवर टीका

हवेतून ऑक्सिजन शोषून त्यातून शुद्ध ऑक्सिजन रुग्णांना पुरविण्यात येतो. साधारणत: एका प्लांटमधून दररोज सुमारे २ टन (९६० एलपीएम) ऑक्सिजनची निर्मिती होऊन सुमारे २०० ऑक्सिजन बेडला त्याचा पुरवठा करता येऊ शकतो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) ऑक्सिजनची गरज लक्षात घेता ठाणे महापालिका क्षेत्रात ३, कल्याण डोंबिवली व नवी मुंबई महापालिका क्षेत्रात प्रत्येकी २ तर भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार आणि पनवेल इथं प्रत्येकी एक प्लांट उभारण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठी संस्थांची निवड करून त्यांना कार्यादेशही देण्यात आला. पुढील काही दिवसांमध्ये ते कार्यान्वित होतील, अशी अपेक्षा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

सध्याच्या परिस्थितीत आणि भविष्यातही ऑक्सिजनची गरज भासल्यास या प्लांटमधून निर्माण होणारा ऑक्सिजन त्यासाठी उपयुक्त ठरेल, असंही त्यांनी सांगितले. याच धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातही दिवसाला एक ते दीड टन ऑक्सिजन निर्मिती करणारे ५ ते ६ प्लांट उभारण्यात येणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

(maharashtra government will build 14 new oxygen plant in mumbai metropolitan region says eknath shinde)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा