Advertisement

आरोग्य विभागात लवकरच साडेपंधरा हजार पदांची भरती


आरोग्य विभागात लवकरच साडेपंधरा हजार पदांची भरती
SHARES

सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली असून गट अ ते क पर्यंतची एकूण 15 हजार 511 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (dattatray bharne) यांनी दिली.

दत्तात्रय भरणे यांनी सांगितले, ‘एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्‍त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग इत्यादी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. तसेच गट अ ची 4 हजार 417 पदे, गट ब ची 8 हजार 31 पदे आणि गट क ची 3 हजार 63 पदे अशी एकूण 15 हजार 511 पदे भरण्यास वित्त विभागाने सन 2018 पासून मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने या पदांचे आरक्षण तपासून पदभरती गतीने राबवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.

हेही वाचा- स्वबळाची भाषा करणाऱ्यांना जनता पळायला लावेल- प्रविण दरेकर

उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने एमपीएससी सदस्यांची 4 रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. सदस्यांची ही पदे भरण्यासाठी जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याबाबतही बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य संख्येत वाढ करण्याच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा करण्यात आली. जेणेकरुन भविष्यातील मुलाखती गतीने पार पाडता येतील.

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) दरवर्षी पुढील संपूर्ण वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. त्याच धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर करण्याबाबतचे निर्देशही देण्यात आले आहेत, अशी माहितीदेखील दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिली. 


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा