Advertisement

दोन आठवड्यांत राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ लाखांपर्यंत, दिवसाला हजार मृत्यूंची शक्यता

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला आहे. त्यातच आता आरोग्य विभागाच्या अहवालामुळे कोरोनाची भिती अधिक गडद झाली आहे.

दोन आठवड्यांत राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ लाखांपर्यंत, दिवसाला हजार मृत्यूंची शक्यता
(Representational Image)
SHARES

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला आहे. त्यातच आता आरोग्य विभागाच्या अहवालामुळे कोरोनाची भिती अधिक गडद झाली आहे. महाराष्ट्रात पुढील दोन आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढणार असून ४ एप्रिलपर्यंत राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन लाखांपर्यंत जाणार असल्याचं आरोग्य विभागाने म्हटलं आहे. 

कोरोना रुग्णांचं प्रमाण आठवड्याला एका टक्के वाढत असल्याचं सर्व जिल्ह्यांमधून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. याच आकडेवारीच्या आधारे राज्याच्या आरोग्य विभागाने हा अंदाज व्यक्त केला आहे.  सध्या राज्यात २ लाख ४७ हजार २९९ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. पुणे, नागपूर, मुंबईमध्ये अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.  

दोन आठवड्यात पुण्यामध्ये ६१ हजार १२५, नागपूरमध्ये ४७ हजार ७०७ तर मुंबईत ३२ हजार ९२७ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असतील असा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य सेवा अपुऱ्या पडतील असंही सांगितलं जात आहे. नागपूर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. तसेच पुढील ११ दिवसांमध्ये मृतांची संख्या ६४ हजारांचा टप्पा ओलांडेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मृत्यू दर २.२७ टक्के  आहे. याच दराच्या आधारे पुढील दोन आठवड्यांमध्ये राज्यामधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८ लाख २४ हजार ३८२ इतकी होईल आणि मृतांचा आकडा हा ६४ हजार ६१३ पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजेच महाराष्ट्रात पुढील दोन आठवड्यांमध्ये करोनामुळे दिवसाला एक हजार जणांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.

राज्यामध्ये बेड्सची संख्या, आयसीयू बेड्स आणि व्हेटिंलेटर्सची संख्या पुरेशी असली तरी ऑक्सिजन सेवा असणाऱ्या बेड्सची संख्या चार हजारांनी वाढवण्याची गरज आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. पुढील काही दिवसांमध्ये ठाणे आणि नागपूर या दोन जिल्ह्यांमधील बेडची संख्या वाढवली नाही तर परिस्थिती गंभीर होईल अशी भीती राज्यातील आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी व्यक्त केली आहे.



हेही वाचा -

  1. चिंताजनक! देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात


मुंबईकरांना आता घराजवळच मिळणार कोरोना लस; महापालिकेचा केंद्राला प्रस्ताव

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा