Advertisement

ठाण्यातील कॅन्सर रुग्णालयाला १ रुपया नाममात्र दराने भूखंड

ठाण्यात उभारण्यात येणाऱ्या कॅन्सर (कर्करोग) रुग्णालयासाठी नगरविकास विभागाने ३० वर्षांच्या कालावधीसाठी १ रुपया नाममात्र दराने भूखंड देण्यास ठाणे महापालिकेला मंजुरी दिली आहे

ठाण्यातील कॅन्सर रुग्णालयाला १ रुपया नाममात्र दराने भूखंड
SHARES

ठाण्यात (thane) उभारण्यात येणाऱ्या कॅन्सर (कर्करोग) रुग्णालयासाठी नगरविकास विभागाने ३० वर्षांच्या कालावधीसाठी १ रुपया नाममात्र दराने भूखंड देण्यास ठाणे महापालिकेला मंजुरी दिली आहे. या भूखंडावर ठाणे व परिसरातील नागरिकांना कॅन्सरवर दर्जेदार आणि किफायतशीर उपचार मिळावेत, यासाठी सुसज्ज असं कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे.

ठाणे महापालिका, टाटा मेमोरिअल सेंटर आणि जितो एज्युकेशनल व मेडिकल ट्रस्ट यांच्या माध्यमातून साकारणाऱ्या या प्रकल्पासाठी नाममात्र दराने भूखंड देण्यास नगरविकास विभागाने मंजुरी दिली असून त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या नेतृत्वाखाली लवकरच ठाणे महापालिका, टाटा मेमोरिअल सेंटर आणि जितो एज्युकेशनल व मेडिकल ट्रस्ट यांच्यातील त्रिपक्षीय सामंजस्य करारावर अंतिम मोहोर उमटवण्यात येणार आहे.

महापालिकेचा पुढाकार

कॅन्सर रुग्णांचं वाढतं प्रमाण, महागडे उपचार आणि मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयावर येणारा ताण या बाबी लक्षात घेऊन ठाण्यात अत्याधुनिक उपचारांची सोय असलेलं सुसज्ज असं कॅन्सर हॉस्पिटल असावं, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील होते.

त्यानुसार ठाणे महापालिकेने (thane municipal corporation) टाटा मेमोरिअल सेंटर समवेत अशा प्रकारचं रुग्णालय उभारण्याबाबत चर्चा केली. टाटा मेमोरिअल सेंटरने याबाबत स्वारस्य दाखवलं. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने याबाबतचा ठराव करून माजीवडे येथील रुस्तमजी गृहसंकुलातील सुविधा भूखंडाअंतर्गत प्राप्त झालेला भूखंड या प्रकल्पासाठी देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने या प्रस्तावाला मंजुरी देण्याची विनंती नगरविकास विभागाला केली होती.

हेही वाचा- ठाणे महापालिकेत ४२ जागांसाठी भरती, ६० हजारापर्यंत वेतन

नाममात्र दराने भूखंड

नगरविकास विभागाने सदरचा भूखंड ३० वर्षांच्या कालावधीसाठी १ रुपया नाममात्र दराने देण्यास ठाणे महापालिकेला मंजुरी दिली आहे. ठाणे महापालिका, टाटा मेमोरिअल सेंटर आणि जितो एज्युकेशनल आणि मेडिकल ट्रस्ट संयुक्तरित्या या रुग्णालयाची उभारणी करणार आहेत. 

टाटा मेमोरिअल सेंटरसारख्या, देशातील सर्वोत्तम कॅन्सर रुग्णालय चालवण्याचा अनुभव असलेल्या रुग्णालयाच्या माध्यमातून या नव्या रुग्णालयाचे परिचालन होणार असल्यामुळे नागरिकांना दर्जेदार व अद्ययावत उपचार किफायतशीर दरात उपलब्ध होतील, असा विश्वास नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी व्यक्त केला.

(maharashtra urban development department sanction a land for proposed thane cancer hospital)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा