Advertisement

पाडव्याच्या दिवशीच गमावला मुलगा, आईने घेतला अवयवदानाचा वसा


पाडव्याच्या दिवशीच गमावला मुलगा, आईने घेतला अवयवदानाचा वसा
SHARES

ऐन दिवाळीच्या सणातच मीरारोड येथील उचिल कुटुंबियांवर काळाने घाला घातला. दिवाळीच्या पाडव्याला मीरारोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात काम करणाऱ्या रुपा उचिल यांनी त्यांचा 20 वर्षांचा मुलगा गमावला. प्रतिक उचिल हा पाडव्याच्या दिवशी मोटार सायकलवरून घरी येत असताना त्याचा अपघात झाला. या अपघातात प्रतिकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.


डॉक्टरांनी केले ब्रेनडेड घोषित

जखमी अवस्थेत असलेल्या प्रतिकला काशिमीरा येथील ऑर्बिट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला वोक्हार्ट रुग्णालयात हलवण्यात आलं. दोन दिवस त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. पण, मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागल्याने डॉक्टरांनी रविवारी रात्री उशिरा त्याला ब्रेनडेड घोषित केलं.


तिघांना मिळाले जीवनदान

क्षणाचाही विलंब न लावता प्रतिकच्या आईने त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. आपल्या मुलाच्या अवयवांमुळे दुसऱ्या आईचं दु:ख कमी होईल, या विचारानेच त्यांनी अवयवदान करण्याचे ठरवले. प्रतिकचे यकृत, दोन मूत्रपिंड आणि दोन कार्निया दान करण्यात आले आहेत. यामुळे आज तिघांना जीवदान आणि दोघांना दृष्टी मिळाली आहे.


मेंदूचे कार्य थांबल्याने त्याला ब्रेनडेड घोषित केलं. मुलाच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या स्थितीतही त्यांनी धीर एकवटून आपल्या मुलाचे अवयवदान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे तिघांना नवजीवन मिळाले असून दोघांना दृष्टी मिळाली आहे.

- रवी हिरवानी, केंद्र प्रमुख, वोक्हार्ट रुग्णालय


मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातच प्रतिकच्या यकृत आणि एका मूत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण झाले आहे. दुसरे मूत्रपिंड हिंदुजा रुग्णालयातील एका व्यक्तीला दान करण्यात आले आहे. त्याचे कॉर्निआ बोरीवली येथील रोटरी आय बॅंककडे पाठवण्यात आले आहे. मुंबईमध्ये सलग दोन दिवसांतली ही तिसरी अवयवदानाची घटना आहे.


हेही वाचा - 

दोन मेंदूमृत महिलांच्या अवयवदानामुळे ६ जणांना जीवदान

मृत्यूनंतरही 'त्या'ने वाचवले 6 जीव!


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा