Advertisement

अग्निशमन दलाकडून मुंबईत अडीच लाख लिटर औषध फवारणी

महिन्याभरापासून मुंबईतील ज्या इमारतीत कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, तिथे जाऊन अग्निशमन दलाने सोडियम हायपोक्लोराइटच्या द्रावणाची फवारणी केली आहे.

अग्निशमन दलाकडून मुंबईत अडीच लाख लिटर औषध फवारणी
SHARES

मुंबईत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका रात्रंदिवस काम करत आहे. पालिकेचे सर्वच विभाग यामध्ये आपली मोलाची सेवा देत आहेत. अग्निशमन दलानेही मुंबईतील प्रत्येक वस्तीत जाऊन प्रचंड काम केले आहे. महिन्याभरापासून मुंबईतील ज्या इमारतीत कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, तिथे जाऊन अग्निशमन दलाने सोडियम हायपोक्लोराइटच्या द्रावणाची फवारणी केली आहे. अग्निशमन दलाने एका महिन्यात ३ हजार ६३ ठिकाणी २ लाख ४७ हजार लिटर औषध फवारणी केली आहे.

मुंबईत ज्या रुग्णालयांत कोरोनाचे रुग्ण  दाखल होत आहेत, अशा रुग्णालयांमध्ये मुंबई अग्निशमन दलाकडून एक दिवसाआड नियमितपणे फवारणी केली जात आहे. अग्निशमन दलाच्या ३२ पथकांद्वारे  सोडियम हायपोक्लोराइटची फवारणी करण्यात येत आहे. या पथकांमध्ये एकूण १६० जवानांचा समावेश आहे. या फवारणीसाठी मुंबई अग्निशमन दलाची १७ क्विक रिस्पॉन्स व्हेइकल, ९ मिस्ट फ्लोइंग मशीन आणि ६ बूम मिस्ट मशीन प्रामुख्याने वापरण्यात येत आहेत.

फवारणी करत असताना अग्निशमन दलाच्या जवानांकडून मास्क आणि 'हॅन्ड ग्लोव्हज' इत्यादींचा वापर करण्यात येत आहे. सोशल  डिस्टन्सिंगचंही काटेकोर पालन करण्यात येत आहे. रुग्णालयात फवारणी करताना वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असणारा प्रतिबंधात्मक पोशाख परिधान केला जात आहे. ही फवारणी सकाळी व संध्याकाळी केली जात आहे. ज्या इमारतीमध्ये किंवा परिसरात रुग्ण आढळून आला आहे त्या ठिकाणी फवारणी करताना, सदर ठिकाणच्या लगतच्या परिसरात देखील फवारणी करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने सदर ठिकाणाच्या लगेच असणारी हाऊस गल्ली, रस्ते, छोट्या गल्ल्या, लगतचे सार्वजनिक परिसर इत्यादींचा समावेश असल्याचं अग्निशमन दलाने स्पष्ट केलं.



हेही वाचा -

सुप्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांचं निधन

मुंबईत कोरोनानं घेतला आणखी २५ जणांचा बळी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा