Advertisement

खिशातून ५ लाख भरा, नानावटीच्या विश्वस्तांना धर्मादाय आयुक्तांचे आदेश

नानावटी रुग्णालयाच्या विश्वस्तांना स्वत: च्या खिशातून ५ लाख रुपये दंड म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीत भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी हे आदेश दिले आहेत.

खिशातून ५ लाख भरा, नानावटीच्या विश्वस्तांना धर्मादाय आयुक्तांचे आदेश
SHARES

गरीब रुग्णांना योग्य सुविधा न दिल्याबद्दल नानावटी रुग्णालयाच्या विश्वस्तांनी स्वत: च्या खिशातून ५ लाख रुपये दंड म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीत भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी हे आदेश दिले आहेत. शिवाय, या दंडाची बातमी नानावटीच्या विश्वस्तांनी ज्या वृत्तपत्रात खुलासा केला होता, तिथे आवर्जून द्यायला सांगितली आहे.


काय आहे नेमकं प्रकरण?

धर्मादाय आयु्क्त शिवकुमार डिगे यांनी १२ डिसेंबरला नानावटी रुग्णालयात सामान्य रुग्ण म्हणून भेट दिली होती. रुग्णालयाला अचानक दिलेल्या भेटीत रुग्णालयाचा खरा चेहरा समोर आला होता. आयुक्तांना आलेला अनुभव आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राबवण्यात येणाऱ्या योजनेच्या त्रुटींबद्दल विश्वस्तांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. पण, या नोटीशीचा खुलासा देण्याऐवजी रुग्णालयाने एका वृत्तपत्राकडे आयुक्तांच्या भेटीचा खुलासा दिला होता. त्यामुळे आयुक्तांच्या अवमानाप्रकरणी रुग्णालय विश्वस्तांनी स्वत:च्या खिशातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीत ५ लाख रुपये भरावेत, असा आदेशच धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिला आहे.



फक्त प्रतिमा जपण्यासाठी

रुग्णालय विश्वस्तांनी स्वत: ची प्रतिमा जपण्यासाठी एका वृत्तपत्रात खुलासा केला होता. शिवाय, वृत्तपत्रातील त्या बातमीमुळे आयुक्तांचा अवमान झाला होता. म्हणून रुग्णालय विश्वस्तांना अवमान नोटीस पाठवण्यात आली. यावर कारवाई करण्याचं स्पष्टीकरण मागवण्यात आलं. त्यावेळी रुग्णालयाने स्पष्टीकरण देताना माफी मागितली. पण, कोणत्याही अधिकाऱ्याचा अपमान होईल, अशी बातमी देणं हे कृत्य माफ करण्यासारखं नसून एखाद्या विश्वस्तांना माफी देऊन सोडलं तर तिच चूक पुन्हा भविष्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विश्वस्तांनी दंड म्हणून ५ लाख रुपये स्वत: च्या खिशातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीत भरावे, असा आदेश नानावटी रुग्णालयाच्या विश्वस्तांना देण्यात आला आहे.


बातमीही द्यावी वृत्तपत्रात

या दंडाची बातमीही त्या वृत्तपत्रात द्यावी ज्या वृत्तपत्राकडे नानावटीच्या विश्वस्तांनी खुलासा केला होता. आणि त्या वृत्तपत्राने ती बातमी लावण्यास नकार दिला तर जाहिरात म्हणून बातमी द्यावी आणि त्याचे पैसेही स्वत: च द्यावे असंही धर्मादाय आयु्क्त शिवकुमार डिगे यांनी स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा-

धर्मादाय आयुक्तांनी केलं स्टिंग ऑपरेशन, नानावटी रुग्णालयाविरुद्ध गुन्हा दाखल होणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा