राष्ट्रीय मुख आरोग्य दिन : तुम्ही दोन वेळेस दात घासता का?

 Fort
राष्ट्रीय मुख आरोग्य दिन : तुम्ही दोन वेळेस दात घासता का?

कुठल्याही आजारानिमित्त आपण डॉक्टरांकडे गेलो की तुमचं तोंड स्वच्छ आहे का? किंवा तुम्ही तुमचं तोंड नीट धुता का? असे प्रश्न डॉक्टर विचारतात. भलेही हे प्रश्न आपल्याला फारसे महत्त्वाचे वाटत नसले, तरी आपल्याला जेव्हा तोंडाचे आजार प्रकर्षाने जाणवू लागतात, तेव्हाच आपल्याला या प्रश्नाचं महत्त्व कळतं. त्यानंतर आपण आपसूकच दातांच्या किंवा तोंडाच्या डॉक्टरांकडे धाव घेतो.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की तोंडाचे आजार म्हणजे नेमकं काय? दातांची किड, हिरड्यांचा रोग, दातांची झीज आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे तोंडाचा कर्करोग, असे आजार वाढताना दिसून येत आहेत.


राष्ट्रीय मुख आरोग्य दिन

1 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय मुख आरोग्य दिन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. इंडियन सोसायटी ऑफ पीरिओडोन्टोलॉजीकडून भारतात दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

या दिनानिमित्त सेंट जॉर्ज दंत रुग्णालयातर्फे दरवर्षी मुख आरोग्य शिबीर राबवलं जातं. कारण, मुंबईसह महाराष्ट्रात मुख स्वच्छतेचा अभाव असल्याचं आढळून आलं आहे. या आरोग्य शिबिरांमधून नागरिकांना तोंड कसं स्वच्छ ठेवाव? किंवा ब्रश कसं कराव?,याबद्दल माहिती दिली जाते.    

मुंबईतील सेंट जॉर्ज दंत शल्यचिकित्सालयात दरवर्षी 60 लाख रुग्णांच्या किडलेल्या दातांवर उपचार करण्यात येत असल्याची माहिती दंत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मानसिंग पवार यांनी दिली.राज्यात तोंडाच्या आरोग्याबाबत जागरूकतेचा अभाव आहे. जेवल्यानंतर दोन वेळा ब्रश केलं पाहिजे किंवा चूळ भरली पाहिजे, हे आपण स्वत:च आपल्या मुलांना सांगत असतो. पण, काही काळानंतर ही सवय सुटते आणि मग तोंडाचे बरेचसे आजार जडतात. 

मानसिंग पवार, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय

जवळपास 70 टक्के नागरिकांना तोंडाच्या आजारांबद्दल माहितच नसतं. त्यामुळे अनेकजण तंबाखू, गुटख्याच्या आहारी जातात. यातूनच तोंडाच्या कर्करोगाची समस्या निर्माण होते. यामुळे बऱ्याचदा रुग्णांच्या तोंडाची शस्त्रक्रिया करावी लागते.

राज्यात तंबाखूमुळे होणाऱ्या तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण 80 टक्के एवढं आहे. यात 40 टक्के पुरूषांचा समावेश आहे . तर, 30 टक्के महिला आणि 10 टक्के महाविद्यालयीन मुलांचा समावेश आहे.

दंत शल्यचिकित्सा रुग्णालयाने आतापर्यंत राबवलेल्या शिबिरातून जानेवारी 1 ते 31 जुलै 2017 पर्यंत 5,382 नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत. तर, या रुग्णालयात दर दिवशी ओपीडीत जवळपास 250 ते 350 लोक दातांचं दुखणं घेऊन येतात. तसंच एकावेळी वेगवेगळ्या 7 डिपार्टमेंटमध्ये 3000 हजार रुग्णांवर उपचार केली जातात.

बदललेल्या जीवनशैलीत आपल्या खाण्याच्या सवयी देखील बदलल्या. आपण बऱ्याचदा जंक फूड खाणं पसंद करतो. त्याचा परिणाम आपल्या शरीरासह दात किंवा तोंडावर होतो.


आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिवसातून दोन वेळा जेवा असं सांगितलं पण, आता आपण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जेवतो. त्यातही जेवताना घरचा आहार घेऊच असं नाही. वेळ मिळाला तर तोंड साफ करतो. पण, असं करणं आपल्या शरीरासाठी घातक आहे. त्यासोबच आपल्या दातांवरही त्याचा परिणाम होतो. 

डॉ. वरुण सूर्यवंशी, दंतचिकित्सक, सेंट जॉर्ज दंत महाविद्यालय
तोंड साफ ठेवण्यासाठी काय कराल

  • जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर लगेच चूळ भरा
  • सकाळी आणि रात्री झोपताना ब्रश करा 
  • दातांना मजबूत करणाऱ्या पदार्थांचा वापर करुन दात घासा
  • दात घासल्यावर तोंडात निर्माण होणाऱ्या लाळेमुळे पचन सुधारते


दात खराब का होतात?

  • एकाच वेळी थंड आणि गरम पदार्थांचं सेवन केल्यानं दात ढिले होतात
  • तंबाखू, पान, सिगरेट या व्यसनांमुळे दातांवर किटण साचतं
  • दात कोरण्याच्या सवयीमुळे हिरड्यांमध्ये जखम होते
  • दात जोरात घासल्यानं हिरड्या सोलवटतात


त्यामुळे, आपले तोंड आणि दात स्वच्छ ठेवण्यावर नक्की भर द्या. कारण तोंडाचं आरोग्य राखल्यास, संपूर्ण शरीराचं आरोग्य राखण्यास मदत होते.


सेंट जॉर्ज दंत शल्यचिकित्सालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी दातांवर केलेला एक व्हीडिओ - 

https://www.youtube.com/watch?v=iGVlAFStrMk&feature=youtu.be
Loading Comments