Advertisement

गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमध्ये नफेखोरीला आळा...उपकरणांच्या किंमती निश्चित!


गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमध्ये नफेखोरीला आळा...उपकरणांच्या किंमती निश्चित!
SHARES

स्टेण्ट, कॅथेटरच्या किंमती निश्चित करत देशातील हजारो रुग्णांना दिलासा दिल्यानंतर आता राष्ट्रीय औषध दरनियामक प्राधिकरणा (एनपीपीए)ने गुडघ्याच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनाही मोठा दिलासा दिला आहे. बुधवारी एनपीपीएने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या वैदयकीय उपकरणांच्या किंमती निश्चित केल्या आहेत. किंमतींमध्ये आव्वाच्या सव्वा वाढ करत रूग्णांची लूट करणाऱ्या डॉक्टरांना, रुग्णालयांना आणि वैदयकीय उपकरणांची निर्मिती करणाऱ्यांना मोठा दणका दिला आहे. आता ज्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी अंदाजे 9 लाख रुपये खर्च येत होता, तिथे आता हीच शस्त्रक्रिया अडीच ते तीन लाखांत होईल, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या वैदयकीय उपकरणांच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढवत रूग्णांची लूट केली जात असल्याच्या तक्रारी होत्या. तर या उपकरणांच्या किंमती निश्चित करण्याची मागणीही जनआरोग्य चळवळीकडून उचलून धरण्यात आली होती. त्यानुसार एनपीपीएने यासंबंधीचा अभ्यास करत 4 आणि 9 ऑगस्ट रोजी एक आकडेवारी जारी केली. या आकडेवारीनुसार गुडघ्याच्या शस्त्रक्रियेत 313 टक्क्यांपर्यंत तर गुडघ्याच्या पुन:शस्त्रक्रियेत 277 टक्क्यांपर्यंत नफेखोरी होत असल्याचे उघड झाले होते. त्यानुसार एनपीपीएने यासंबंधी कंपन्या, रुग्णालय, डॉक्टरांसह सर्वसामान्यांकडून सूचना-हरकती मागवल्या होत्या. त्याचवेळी गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठीच्या वैदयकीय उपकरणांच्या किंमती निश्चित करण्याचे स्पष्ट संकेतही दिले होते.

त्यानुसार अखेर बुधवारी एनपीपीएने या वैदयकीय उपकरणांच्या किंमती निश्चित करत कंपन्यांना दणका तर रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. अंदाजे 65,782 रुपयांची वैदयकीय उपकरणे रुग्णांना थेट 4 लाख 13 हजार रुपयांपर्यंत विकली जात असल्याची धक्कादायक बाब एनपीपीएच्या आकडेवारीनुसार उघड झाली होती. या कृत्रिम दरवाढीमुळे गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला पूर्णत: नऊ लाखांपर्यंत खर्च करावा लागत असल्याचे चित्र आहे. आता मात्र ही शस्त्रक्रिया अडीच ते तीन लाखांत होण्याची शक्यता असल्याची माहिती तज्ज्ञांकडून दिली जात आहे. कारण टिबिअल प्लेट(सांध्यांचे रोपण) साठी 1 लाख 22 हजार 336 रुपये घेतले जायचे, तिथे आता केवळ 9550 ते 24,280 रुपये रुग्णांना मोजावे लागणार आहेत. तर पुन:शस्त्रक्रियेसाठीच्या टिबिअल प्लेटसाठी 1 लाख 65 हजार रुपये रूग्णांना अदा करावे लागत होते, तिथे आता केवळ 31 हजार 220 रुपये रुग्णांना मोजावे लागणार आहेत, हे विशेष.

फेमोरेलसाठी (मासांच्या शस्त्रक्रियेसाठीची उपकरणे) 24 हजार 90 रुपये ते 38 हजार 740 रुपये मोजावे लागणार आहेत. तर पुन:शस्त्रक्रियेसाठीच्या फेमोरेलसाठी 74 हजार 875 रुपये ते 2 लाख 68 हजार 500 रुपये मोजावे लागत होते. तिथे आता नव्या किंमतीनुसार केवळ 62 हजार 770 रुपये मोजावे लागणार आहेत. 

पटेलासाठी पहिल्या वेळेस केवळ 4 हजार 90 रुपये तर पुन:शस्त्रक्रियेतही 4 हजार 90 रुपयेच रुग्णांना अदा करावे लागणार आहेत. या पटेलाच्या विक्रीतून रूग्णालये आणि कंपन्या 196 टक्क्यांपर्यंतचा नफा कमावत होते. आता वैदयकीय उपकरणांच्या किंमती निश्चित झाल्याने नफेखोरीला आळा बसणार आहे.


कंपन्या, रुग्णालयांनो खबरदार..कृत्रिम टंचाई कराल तर!

स्टेण्ट आणि कॅथेटरच्या किंमती निश्चित झाल्यानंतर रुग्णालये, डॉक्टरांसह कंपन्यांनी आगपाखड करत सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. तर कृत्रिम टंचाईही निर्माण केली होती. पण एनपीपीएसह सरकारने योग्य ती खबरदारी घेतल्याने आता स्टेण्ट आणि कॅथेटरची विक्री निश्चित किंमतीत होत असून टंचाईचा प्रश्नच येत नाही. असे असताना आता गुडघ्याच्या वाटीच्या रोपणासाठीच्या वैदयकीय उपकरणांच्या किंमती निश्चित केल्याने कंपन्या, रुग्णालयांकडून या उपकरणांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाण्याची दाट शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेत बुधवारी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात एनपीपीएने कंपन्या आणि रुग्णालयांना कृत्रिम टंचाई निर्माण न करण्याची तंबीच दिली आहे. तर या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आदेशही एनपीपीएने दिले आहेत हे विशेष.



हेही वाचा

गुडघ्याच्या पुनर्शस्त्रक्रियेतही रूग्णांची लूट, 277 टक्क्यांपर्यंत नफेखोरी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा