Advertisement

मुंबईत खाटांची कमतरता; 'इतके' टक्केच खाटा रिक्त

रुग्णालयांत पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यानं भार वाढत असून, खाटांची क्षमता वाढविण्यातही अडचणी येत आहेत.

मुंबईत खाटांची कमतरता; 'इतके' टक्केच खाटा रिक्त
SHARES

मुंबईत रुग्णालयातील २३ टक्के खाटा रिक्त असून खासगी रुग्णालयातील खाटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महापालिकेने खाटांची क्षमता २१ हजार करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी अद्याप १२५०० खाटाच उपलब्ध झाल्या आहेत. रुग्णालयांत पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यानं भार वाढत असून, खाटांची क्षमता वाढविण्यातही अडचणी येत आहेत.

मुंबईत कोरोनाबाधितांचं प्रमाण १५ टक्क्यांवर गेलं आहे. कोरोनाबाधितांमध्ये उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय रहिवाशांचा समावेश अधिक असून यांचा कल खासगी रुग्णालयांकडं अधिक असल्यानं पुन्हा एकदा खासगी रुग्णालयांमधील खाटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सौम्य लक्षणं असलेले रुग्णही भीतीपोटी रुग्णालयात दाखल होत आहेत. खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या ६३० खाटांपैकी केवळ १८२ खाटा रिक्त आहेत.

महापालिकेनं गेल्या आठवड्यातच २१ हजार खाटा सुरू करण्याचे सांगितले होते. परंतु, प्रत्यक्षात अजूनही १२ हजार ७४२ खाटा उपलब्ध झाल्या आहेत. मुंबईत १ हजार खाटांची क्षमता असलेल्या सेव्हनहिल्स रुग्णालयात जागा रिक्त नाहीत. वांद्रे-कुर्ला संकुलातील १ हजार खाटा असलेल्या कोरोना आरोग्य केंद्रात ९४० रुग्ण उपचार घेत आहेत. १०० खाटांच्या अतिदक्षता विभागात केवळ ९ खाटा शिल्लक आहेत.

एकीकडं लसीकरण वाढविण्याचा दबाव आणि दुसरीकडं वाढती रुग्णसंख्या यामुळं रुग्ण दाखल करण्याची क्षमता वाढविण्याचा दबाव रुग्णालयांवर आहे. परंतु यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्यानं रुग्णालयांची कोंडी झाली आहे. मोठ्या कोरोना केंद्रामध्ये खाटा अधिक असल्या तरी आवश्यक पुरेशा प्रमाणात डॉक्टर आणि परिचारिका उपलब्ध होत नसल्यानं अजून या खाटा उपलब्ध करून देणं रुग्णालयांना शक्य झालेलं नाही.

मुलुंडच्या कोरोना केंद्रात आणखी ४५० खाटा येत्या काही दिवसांत वाढवण्यात येणार आहे, तर बीकेसीमध्ये ७९८ खाटा मंगळवारपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उपनगरीय रुग्णालयांमध्ये सुमारे ७५० खाटा वाढवण्याचे आदेश महापालिकेनं दिले आहेत. त्यांनाही मनुष्यबळाची समस्या भेडसावत आहेत.

खासगी रुग्णालयात खाटांची कमतरता नसून, लोकांना एखादे विशिष्ट रुग्णालय हवे असा आग्रह असल्याने खाटांची कमतरता असल्याचे भासविले जात आहे. त्यामुळे लोकांमध्ये विनाकारण भीती निर्माण होत आहे. सोमवारी आणखी दोन हजार खाटा छोट्या नर्सिंग होममध्ये वाढविल्या असून एकूण साडे चार हजार खाटा खासगी रुग्णालयात उपलब्ध आहेत.

महापालिका रुग्णालयात  खाटांची कमतरता नाही. त्यामुळं रुग्णानी ठरावीक रुग्णालयात खाटा मिळण्याची आग्रह धरू नये. उपचार सर्व ठिकाणी योग्यरितीनं दिले जात आहेत. सध्या १५ हजार खाटा उपलब्ध असून, येत्या आठवड्याभरात २० हजारपर्यंत खाटा वाढवण्यात येणार आहेत. आवश्यक मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीनं तातडीनं घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.



हेही वाचा -

नियम न पाळल्यास राज्यात लॉकडाऊन, लॉकडाऊनचे नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

शरद पवारांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये केलं दाखल, बुधवारी शस्त्रक्रिया


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा