Advertisement

जनऔषधी केंद्रांत अवघ्या १ रुपयांना सॅनिटरी नॅपकिन

केंद्रीय औषधीनिर्माण विभागातर्फे सामाजिक जाणिवेतून प्रतिपॅड १ रूपया दराने सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

जनऔषधी केंद्रांत अवघ्या १ रुपयांना सॅनिटरी नॅपकिन
SHARES

देशभरात उद्भवलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश महिलांना शारीरिक स्वच्छता, आराेग्याच्याबाबतीत तडजोड करत घरातच बंदीस्त राहावं लागत आहे. हे लक्षात घेऊन केंद्रीय औषधीनिर्माण विभागातर्फे सामाजिक जाणिवेतून प्रतिपॅड १ रूपया दराने सॅनिटरी नॅपकिन्स (sanitary napkins available in 1 rupees at jan aushadhi kendra ) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील ४५५ जनऔषधी केंद्रांमध्ये हे स्वच्छ किंमतीतले सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

कोरोना संकट आणि लाॅकडाऊनच्या स्थितीत औषध दुकाने, जीवनावश्यक सेवांची दुकाने जरी खुली असली, तरी सद्याच्या स्थितीत या दुकानांपर्यंत महिलांना जाणं अवघड झालं आहे. शिवाय कंटेन्मेंट झोन परिसरात तर जीवनावश्यक सेवांची दुकानेही बंद असल्याने महिलांना गरज असूनही सॅनिटरी नॅपकिन सारख्या अत्यावश्यक वस्तू मिळणं मुश्कील झालं आहे. काहींची आर्थिक अवस्था तर इतकी बिकट झाली आहे, की गरजेच्या वस्तूंसाठी खर्च करण्यासाठीही पैसे उपलब्ध नाहीत. अशा स्थितीत ही सुविधा महिलांच्या फायद्याची ठरू शकते.

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘स्वच्छ, स्वस्थ आणि सुविधा’ सुनिश्चित करण्यासाठी सॅनिटरी नॅपकिनची किंमत कमी करण्यात आली आहे. जनऔषधी  केंद्रामार्फत विक्री करण्यात येणारे हे पॅड पर्यावरणाला अनुकूल आहेत. या पॅडसाठी वापरण्यात येणारं साहित्य हे जैव-विघटनशील आहे. हे साहित्य ‘एएसटीएम डी-६९५४ मानकांनुसार बनविण्यात आलेलं आहे.

हेही वाचा - धक्कादायक! मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अधिक

सध्या बाजारात उपलब्ध असलेले सॅनिटरी नॅपकिन्स प्रति पॅड ३ ते ८ रूपयांना मिळत आहेत. ही किंमत बऱ्याच महिलांना परवडण्यासारखी नसते. त्यामुळेच प्रतिपॅड १ रूपया दराने सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे.

सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात देखील महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे सुरू आहेत. या केंद्रामार्फत औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. या सर्व जनऔषधी केंद्रांमधून सॅनिटरी नॅपकिन्स १ रूपये प्रतिपॅड दराने उपलब्ध करून दिले जात आहेत.

जिल्हानिहाय जनऔषधी केंद्र

अहमदनगर (८), अकोला (९), अमरावती (१०) औरंगाबाद (१२) बीड (२४) भंडारा (१) बुलढाणा (१९) चंद्रपूर (५) धुळे (५) गडचिरोली (१) गोंदिया (५) हिंगोली (४) जळगाव (१२) जालना (२७) कोल्हापूर (१२) लातूर (४७) मुंबई (१) मुंबई शहर (३४) मुंबई उपनगर (३) नागपूर (९) नांदेड (१७) नंदूरबार (२) नाशिक (१६) उस्मानाबाद (१२) पालघर (१२) परभणी (१७) पुणे (२४)रायगड (९)रत्नागिरी (१) सांगली (१२) सातारा (१५) सोलापूर (१५) ठाणे (४४) वर्धा (२) वाशिम (५) यवतमाळ (४)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा