स्वाईन फ्लूचा संशयीत रुग्ण आढळला, महापालिकेच्या आरोग्य विभागाचा सावधानतेचा इशारा

हा रूग्ण मुंबईचा नसून पालघरचा होता आणि उपचारांसाठी तो नायर रूग्णालायत दाखल झाला होता. त्यामुळं मुंबईत स्वाईन फ्लूचा कुठलाही धोका नसल्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डाॅ. पद्मजा केसकर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं आहे.

SHARE

मुंबईत सप्टेंबर महिन्यांत स्वाईन फ्लूचा एक संशयित रूग्ण आढळल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. मात्र यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. कारण हा रूग्ण मुंबईचा नसून पालघरचा होता आणि उपचारांसाठी तो नायर रूग्णालायत दाखल झाला होता. त्यामुळं मुंबईत स्वाईन फ्लूचा कुठलाही धोका नसल्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डाॅ. पद्मजा केसकर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं आहे.


नाशिक, पुण्यात थैमान

नाशिक आणि पुण्यामध्ये स्वाईन फ्लूनं थैमान घातलं असून नाशिकमध्ये आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू स्वाईन फ्लूमुळं झाला आहे. त्यामुळं सध्या सर्वांच्याच मनात स्वाईन फ्लूची धास्ती आहे. असं असताना मुंबईत सध्या हवामान बदल होत असून साथीचे आजार बळावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सावधानता बाळागावी, आवश्यक ती काळजी घ्यावी, असं आवाहन डाॅ. केसकर यांनी केलं आहे.


डेंग्यूचा दंश

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर २०१७ मध्ये स्वाईन फ्लूचे ३३ रूग्ण आढळले होते. असं असताना सप्टेंबर २०१८ मध्ये एक संशयित रूग्ण आढळला आहे. तर डेंग्यू, मलेरिया आणि काविळचे रूग्णही वाढतच आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर २०१७ मध्ये डेंग्यूचे ४१२ रूग्ण आढळले होते आणि १२ जणांचा डेंग्यूनं बळी घेतला होता. तिथं यंदा सप्टेंबर २०१८ मध्येही डेंग्यूची भीती कायम असून ३९८ रूग्ण आढळले असून ५ रूग्ण डेंग्यूनं दगावले आहेत.


गॅस्ट्रोचे वाढते रुग्ण

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गॅस्ट्रोचे ५३२ रूग्ण आढळले होते तर यंदा सप्टेंबर महिन्यात हा आकडा ४४५ च्या घरात आहे. काविळच्या रूग्णांमध्ये मात्र गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये काविळचे १०५ रूग्ण आढळले होते तर यंदा सप्टेंबरमध्ये हा आकडा १११ वर गेला आहे. तर लेप्टोचे रूग्ण मात्र यंदा कमी झाले आहेत.


आरोग्य सांभाळा

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून साथीच्या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात आल्यानं सप्टेंबरमध्ये साथीचे आजारा बळावले नसल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागानं केला आहे. सध्या हवामानामध्ये मोठे बदल होत असून पाऊस गायब झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढला आहे. त्यामुळं साथीच्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता महापालिकेच्या आरोग्य विभागानं व्यक्त केली आहे. तेव्हा मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा, असं आवाहनही आरोग्य विभागानं केलं आहे.हेही वाचा-

ठाण्यात आढळला H1N1 चा पहिला रुग्ण

मुंबईत मलेरियाचा पहिला बळी


 


संबंधित विषय
ताज्या बातम्या