Advertisement

हेमोडायलिसिस केंद्राचा 'ट्रॉमा'


हेमोडायलिसिस केंद्राचा 'ट्रॉमा'
SHARES

जोगेश्वरीतील हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात एकतर साध्या डोळ्यांनी न दिसणारं हेमोडायलिसिस केंद्र सुरु झालं आहे किंवा रुग्णालय प्रशासनातल्या निर्णय प्रक्रियेशी संबंधितांना स्मृतिदोष झाला आहे. यापैकी एकही शक्यता खरी नसेल तर मात्र प्रश्न गंभीर आहे. ट्रॉमा केअर रुग्णालयात लवकरच हेमोडायलिसिस केंद्र सुरु होणार, ही घोषणा रुग्णालय प्रशासनाने केली. याला अनेक दिवस लोटले. मात्र प्रत्यक्षात हेमोडायलिसिस केंद्र अस्तित्वात येण्याची शक्यताही दिसत नाही. मूत्रपिंडाच्या आजारांनी त्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळण्यासाठी काही काळ वाट पहावी लागेल. तांत्रिक कारणांमुळे रुग्णालयात हेमोडायलिसिस केंद्र सुरु व्हायला विलंब होणार असल्याची माहिती रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी शशिकांत वाडेकर यांनी दिली आहे.


"खासगी आणि सार्वजनिक अशा संयुक्त स्वरुपात हा प्रकल्प राबवण्याची योजना होती. पण आता हा प्रकल्प मध्यवर्ती खरेदी खाते विभागाकडून करण्यात येणार आहे. या विभागाकडे हेमोडायलिसिस मशिन्सचे प्रस्ताव दर, निविदा आधीच पाठवण्यात आली आहे. या विभागासाठी मोठा स्टाफ आहे आणि आमच्याकडे स्टाफ कमी आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय मलाच घ्यावा लागणार आहे. पण लवकरात लवकर हेमोडायलिसिस सेवा सुरु करण्यात यावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत."

शशिकांत वाडेकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय

रुग्णांनी फक्त दुखणं सहन करायचं?


ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हेमोडायलिसिस केंद्र सुरु होणार, या बातमीने शेकडो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जीवात जीव आला होता. कारण खासगी रुग्णालयात डायलिसिस करण्याचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. ट्रॉमा सेंटरमध्ये हेमोडायलिसिस केंद्र सुरु झाल्यानंतर कमी खर्चात डायलिसिस करणं रुग्णांसाठी शक्य झालं असतं. मात्र ही आशाही आता धूसर होत चालली आहे. रुग्णालय प्रशासनाचा चाललेला संथ कारभार पाहता येत्या महिन्याभरातसुद्धा हेमोडायलिसिस केंद्र सुरु होण्याची शक्यता दिसत नाही. काही रुग्णांना महिन्यातून तीन वेळा डायलिसिस करावं लागतं. जोगेश्वरी आणि आसपासच्या परिसरात अशा रुग्णांची संख्या मोठी आहे. खासगी रुग्णालयांमध्ये महागडा डायलिसिस उपचार करणं शक्य नसणाऱ्या रुग्णांसाठी त्यांना परवडणाऱ्या दरात ही सुविधा मिळवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाच्या तांत्रिक अडचणींचा गुंता सुटण्याची वाट पहावी लागणार आहे.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा