Advertisement

दररोज १५ लाख लसीकरणाची शासनाची तयारी- उद्धव ठाकरे

जगात इतरत्र कोरोनाच्या डेल्टा प्लसचा संसर्ग परत वाढत असून आपल्याकडे सध्या रुग्ण संख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे.

दररोज १५ लाख लसीकरणाची शासनाची तयारी- उद्धव ठाकरे
SHARES

तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असताना आपल्याला अधिक सावध राहिलं पाहिजे, जगात इतरत्र कोरोनाच्या (coronavirus) डेल्टा प्लसचा संसर्ग परत वाढत असून आपल्याकडे सध्या रुग्ण संख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. या पार्श्वभूमीवर शासनाची दररोज १५ लाख लसीकरणाची तयारी असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. 

एमएमआरडीएने मालाड इथं आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत उभारलेल्या समर्पित कोविड रुग्णालयाचं हस्तांतरण मुंबई महानगरपालिकेला करण्यात आलं त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या कार्यक्रमात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, महानगर आयुक्त एस के श्रीनिवासन उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसून सध्या जरी बेडस् रिकामे दिसत असले तरी दुसरी लाट परत उलटू नये म्हणून आपल्याला गर्दी टाळणं, मास्क घालणे हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आपण जगभर कोरोनाची लाट परत उसळत आहे ते पाहून सावध राहावं लागेल.

हेही वाचा- बृहन्मुंबई हद्दीत २४ जुलैपर्यंत जमावबंदी आदेश जारी

‘असं’ आहे मालाडचं जम्बो कोविड सेंटर 

  • मालाड जम्बो कोविड सेंटरमध्ये २१७० बेडस् आहेत. त्यात जवळपास ७० टक्के म्हणजे १,५३६ ऑक्सिजन बेड तर १९० आयसीयू बेड आहेत. लहान मुलांसाठी २०० ऑक्सिजन पेडियाट्रिक बेड आणि ५० पेडियाट्रिक आयसीयू बेड आहेत.
  • दुसऱ्या टप्प्यामध्ये कांजूरमार्ग, सायन, वरळी रेसकोर्स हे नवीन जम्बो सेंटर सुरु होणार. तर नेस्को, रिचर्डसन ॲण्ड क्रूडास भायखळा आणि एनएससीआय मधील बेडची संख्या वाढवणार.
  • जम्बो कोविड सेंटर्सच्या दुसऱ्‍या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यापेक्षाही अधिक म्हणजे ८,३२० इतके बेड उपलब्ध. यात ७० टक्के म्हणजे ५,९८६ ऑक्सिजन बेड तर १,१४० आयसीयू बेड आहेत. लहान मुलांसाठी स्वतंत्र असे ६०० ऑक्सिजन व १५० आयसीयू बेड आहेत.
  • पहिला आणि दुसरा असे दोन्ही टप्पे मिळून जम्बो कोविड सेंटर्समधील एकूण बेड संख्या आता १५ हजार ६२७ होत आहे. त्यात ९,१९३ ऑक्सिजन बेड, १,५७२ आयसीयू बेड आहेत.
  • यामध्ये लहान मुलांसाठी एकूण १,२०० ऑक्सिजन पेडियाट्रिक बेड आणि १५० पेडियाट्रिक आयसीयू बेड उपलब्ध असतील.
  • महानगरपालिकेची प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, सेव्हन हिल्स हॉस्पिटल यांची बेरीज केल्यास एकूण बेड्सची संख्या १९ हजार ९२८ म्हणजे जवळपास २० हजार इतकी.
  • जम्बो कोविड सेंटर्सच्या पहिल्या टप्प्यातील ६ जम्बो कोविड सेंटर्समध्ये मिळून ७ हजार ३०७ बेडस् आहेत. ज्यात ३ हजार २०७ ऑक्सिजन बेड तर ४३२ आयसीयू बेड आहेत. सोबत लहान मुलांसाठी ६०० बेडदेखील आहेत.
  • संभाव्य तिसऱ्‍या लाटेसाठी जवळपास ११ हजार बेड हे ऑक्सिजन सह तर २,३४८ आयसीयू आहेत.
  • सोबतच, लहान मुलांसाठी १,५०० ऑक्सिजन पेडियाट्रिक बेड आणि २३० पेडियाट्रिक आयसीयू बेड उपलब्ध असतील. नवजात बाळांसाठी ६० बेडदेखील यामध्ये बनविण्यात आले आहेत.

हेही वाचा- नियमावलीबाबत गाेंधळ नको, जाणून घ्या नवे निर्बंध सविस्तरपणे


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा