Advertisement

जागतिक एड्स दिन विशेष: मुंबईकरांची एचआयव्हीला टक्कर, प्रमाण 56 टक्क्यांनी घटलं!

मुंबई जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण पथकाच्या कामगिरीमुळे आणि वारंवार होणाऱ्या जनजागृतीमुळे भितीदायक अशा या आजारात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 6 वर्षांत (2010-11 ते 2016-17) एचआयव्हीच्या रुग्णांमध्ये तब्बल 56 टक्क्यांनी घट झाली आहे.

जागतिक एड्स दिन विशेष: मुंबईकरांची एचआयव्हीला टक्कर, प्रमाण 56 टक्क्यांनी घटलं!
SHARES

दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस ‘जागतिक एड्स दिन’ म्हणून पाळला जातो. एड्स, एचआयव्ही या नावानंही अनेकांना भिती वाटते. त्यामुळेच की काय पण या आजाराची तीव्रता कमी झालेली पाहायला मिळतेय. मुंबईत गेल्या 6 वर्षांत (2010-11 ते 2016-17) एचआयव्हीच्या रुग्णांमध्ये तब्बल 56 टक्क्यांनी घट झाली आहे.


आशादायी चित्र

मुंबई जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण पथकाच्या कामगिरीमुळे आणि वारंवार होणाऱ्या जनजागृतीमुळे भितीदायक अशा या आजारात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 2017 च्या या जागतिक एड्स दिनानिमित्त हे चित्र नक्कीच आशादायी ठरणारं आहे.


काय सांगते आकडेवारी?

2010-11 मध्ये एचआयव्हीने त्रस्त असलेले 14 हजार 291 रुग्ण आढळले होते. तर, आता म्हणजे या चालू वर्षात 2016 -17 मध्ये 6 हजार 718 एवढे रुग्ण आढळले आहेत. तर, फक्त ऑक्टोबरमध्ये 3 हजार 870 एचआयव्ही संशयित रुग्णांची नोंद झाल्याची माहिती मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीच्या अतिरिक्त प्रकल्प संचालिका डॉ. श्रीकला आचार्य यांनी दिली.


गर्भवती महिलांचा संसर्गही कमी

मुंबईत गेल्या 6 वर्षांच्या तुलनेत या वर्षी गरोदर महिलांनाही एचआयव्हीची कमी प्रमाणात लागण झाली आहे. 2010-11 मध्ये एकूण 466 गर्भवती रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, 2016-17 मध्ये फक्त 162 गर्भवती महिला रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. म्हणजेच 6 वर्षात गर्भवती महिलांना एचआयव्हीची लागण झाल्याच्या प्रमाणात 65 टक्क्यांनी घट झाली आहे.


पुरुष रुग्णांची संख्या अधिक

15 ते 49 या वयोगटातील 79 टक्के पुरुषांना, तर ३६टक्के महिलांना एचआयव्हीचा संसर्ग झाला आहे. असुरक्षित संबंधांमुळे 93 टक्के लोकांना एचआयव्हीची लागण झाली आहे. 3.7 टक्के प्रकरणांमध्ये आईकडून मुलाला संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. तर, 0.3 टक्के लागण ही विषारी रक्त संक्रमणातून झाली आहे आणि 0.5 टक्के रूग्णांना त्या जंतूची लागण असलेल्या सुयांचा वापर केल्यामुळे एचआयव्हीचा संसर्ग झाला आहे.


गेल्या 2 वर्षांत एचआयव्हीची लागण झालेले खूपच कमी रुग्ण आढळले आहेत. जनजागृती आणि जाहिरात यामुळे हे प्रमाण कमी व्हायला मदत झाली आहे. त्यामुळे एड्समुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण देखील कमी झालं आहे.

डॉ. श्रीकला आचार्य, अॅडिशनल प्रोजेक्ट डायरेक्टर, मुंबई जिल्हा एड्स प्रतिबंध सोसायटी


लहान मुलांसाठी शेल्टर रुम

एचआयव्हीची लागण झालेल्या मुलांसाठी मुंबईच्या डोंगरी परिसरात एका शेल्टर रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. जिथे या मुलांचं स्क्रिनिंग किंवा त्यांच्यावर उपचार केले जातात. बुधवारी या शेल्टर होमचं उद्घाटन करण्यात आलं. त्याचप्रमाणे, गुरुवारी कामाठीपुरा परिसरातही मुंबई महापालिकेतर्फे एआरटी सेंटर खुलं करण्यात आलं आहे. त्याचसोबत जागतिक एड्स दिनानिमित वन रुपी क्लिनिकमध्येही मोफत एचआयव्ही तपासणी करुन घेता येणार असल्याचं डॉ. आचार्य यांनी स्पष्ट केलं आहे.


देशभरातही प्रमाण घटलं

संपूर्ण देशाचा विचार करता, एचआयव्हीचं प्रमाण कमी झाल्याचंच चित्र या चालू वर्षात पाहायला मिळत आहे. भारतात 2015 साली 86 हजार नवीन एचआयव्ही रुग्ण आढळून आले होते. तर, 2000 पासून रूग्णांचं प्रमाण 66 टक्क्यांनी कमी झालं आहे.


काय आहे एचआयव्ही?

एड्स हा विषाणुमुळे होणारा आजार आहे. 'ह्युमन इम्युनोडेफिशिअन्सी व्हायरस'(HIV) म्हणजेच प्रतिकारशक्तीच्या अभावाने झालेल्या अनेक रोगलक्षणांचा एकत्रित समूह. थोडक्यात हा माणसाची प्रतिकारशक्ती कमी करणारा आजार आहे.


कसा आणि का होऊ शकतो एड्स?

  • एचआयव्ही बाधित व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध
  • एचआयव्ही बाधित व्यक्तीचं रक्त किंवा रक्तघटक निरोगी व्यक्तीला दिल्यास म्हणजेच रक्तसंक्रमण
  • एचआयव्ही बाधित रुग्णाला वापरलेल्या सुया किंवा सिरींज निर्जंतुक न करत परत वापरल्यास
  • एचआयव्ही बाधित गरोदर आईपासून तिच्या बाळाला


सर्वसामान्य लक्षणं

  • वजनात 10 टक्क्यांपेक्षा जास्त घट होणं
  • सतत सामान्य ताप, रात्रीचा घाम (1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी)
  • सतत जुलाब आणि कोणत्याही औषधाने बरं न होणं
  • तोंडात, अन्ननलिकेत चट्टे उठणं
  • 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ राहणारी लसिका ग्रंथीची सूज



हेही वाचा

...'ती' कंडोम घ्यायला का कचरते?


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा