
जागतिक आरोग्य संघटने (WHO)ने ८ मार्च हा दिवस जागतिक मूत्रपिंड दिवस म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे या दिवशी मूत्रपिंडाचा आजार, त्याची लक्षणे आणि हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, यावर ठिकठिकाणी मार्गदर्शन केलं जातं. आपल्याला चांगलं जीवन जगायचं असेल, तर शरीरातील सर्व अवयव निरोगी असणं आवश्यक असतं. त्यातही शरीरातील मूत्रपिंड हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे त्याची काळजी घेणं आवश्यकच आहे. मूत्रपिंडाचा आजार होऊ नये, म्हणून काय काळजी घ्यावी याचा आढावा घेऊया.
शरीरातील सर्व अशुद्ध घटक बाहेर टाकण्याचं कार्य मूत्रपिंड अर्थात किडनी करते. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचं कार्य योग्य पद्धतीनं होणं गरजेचं असतं. पण, योग्य काळजी न घेतल्यास मूत्रपिंडाचे विकार जडतात आणि जीवन त्रासदायक होऊन बसतं.

‘किडनी फेल्युअर’च्या प्रमुख कारणांमध्ये ३५ टक्के वाटा मधुमेहाचा आणि १७ टक्के वाटा उच्च रक्तदाबाचा असतो. तसंच, बैठी जीवनशैलीसुद्धा कारणीभूत ठरते.

योग्य दिनचर्या, व्यायाम आणि आहार यामुळे किडनीसह सर्वच विकारांना प्रतिबंध घालता येतो. व्यायाम गरजेचा आहे. व्यायामाने मधुमेहावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येतं.
