Advertisement

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील रस्त्यांचं १,८०० कोटींचं नुकसान

पूरपरिस्थिती तसंच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रूपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तविला आहे.

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील रस्त्यांचं १,८०० कोटींचं नुकसान
SHARES

राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसंच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रूपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तविला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते व पुलांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सर्वाधिक सुमारे ७०० कोटी रूपयांचं नुकसान एकट्या कोकण विभागात झालं असून, त्याखालोखाल पुणे विभाग, अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग व नाशिक विभागाचा क्रम आहे. 

हेही वाचा- २ ते ५ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील हानीची पाहणी करण्यासाठी जिल्हानिहाय मुख्य अभियंत्यांची व समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अद्यापही अनेक ठिकाणी पाऊस सुरू असून, दरडी साफ करण्याचं काम सुरूच आहे. त्यामुळे काही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे, तर अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त रस्त्यांची छायाचित्रे व ड्रोन चित्रिकरणाच्या माध्यमातून प्राथमिक हानीचा अंदाज काढण्यात आला आहे.

प्राथमिक अंदाजानुसार २९० रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते, ४६९ रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाली होती तर १४० पूल व मोऱ्या पाण्याखाली गेले होते. अंतिम पाहणी अहवालात नुकसानाच्या रक्कमेत वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या मंगळवारी ३ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाची मुंबईत बैठक होणार असून त्यावेळीही राज्यातील परिस्थितीचा पुनःश्च आढावा घेतला जाईल. दरम्यान, राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या नुकसानाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा