पश्चिम रेल्वेवरील सात रेल्वे स्थानकांतील प्रवाशांची अरुंद पुलांवरील गर्दीतून होणारी पायपीट अखेर थांबणार आहे. अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, लोअर परळ, प्रभादेवी, जोगेश्वरी, मालाड या रेल्वे स्थानकांत १२ मीटर रुंदीचे पूल उभारण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.
पूर्व-पश्चिम जोडणी असल्याने रेल्वे प्रवाशांसह एका दिशेने अन्य दिशेला जाणाऱ्या पादचाऱ्यांनाही या पुलांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत रॅम्पसह १२ मीटर रुंदीचे पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत.
सात रेल्वे स्थानकांसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या दोन महिन्यांत कंत्राटदार नियुक्त करून तात्काळ पूल उभारण्यास सुरू करण्यात येईल. सध्या अस्तित्वात असलेले अरुंद पूल पाडून नवे पूल उभारण्याचे नियोजन आहे.
पूर्व-पश्चिम दिशेला जोडणाऱ्या पादचारी पुलासह वाहतूक व्यवस्था सुधारणे, प्रवेशद्वारांसाठी पोर्च बनविणे, फलाटावर छत उभारून आवश्यक त्या ठिकाणी छताची उंची वाढविणे, स्थानक दर्शनी भाग आणि लिफ्ट यांची सुधारणा करणे, स्थानक अंतर्गत भागातील प्रतीक्षागृह अद्यावत करणे, स्वच्छतागृहांची सुधारणा करणे आणि अन्य प्रवासी सुविधा संबंधी कामेही अमृत भारत योजनेंतर्गत करण्यात येणार आहेत.
स्थानक आणि रेल्वे हद्दीतील कामे रेल्वे प्रशासनाकडून तर स्थानक परिसरांत आणि महापालिका क्षेत्रात फेरीवालामुक्त राखण्याचे काम संबंधित महापालिकेकडून करण्यात येणार आहे.
पादचरी पुल उभारणार
मरीन लाइन्स
चर्नी रोड
ग्रँट रोड
लोअर परळ
प्रभादेवी
जोगेश्वरी
मालाड
हेही वाचा