गारोडियानगरमधील रस्ते कामात हात कुणाचा?

 Ghatkopar
गारोडियानगरमधील रस्ते कामात हात कुणाचा?

मुंबई - मुंबईतील खासगी वसाहतींमधील अंतर्गत रस्ते हे महापालिकेच्यावतीने आजवर करण्यात येत नाही. परंतु घाटकोपरमधील गारोडियानगरमधील खासगी रस्ते मात्र चक्क महापालिकेच्यावतीने करण्यात आले असून तेही कोणत्याही निविदा न काढता केले असल्याची धक्कादायक माहिती विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी देत या कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

घाटकोपर गारोडियानगर हे खासगी अभिन्यास (प्रायव्हेट लेआऊट) असून यामधील चार रस्ते हे महापालिकेच्यावतीने बनवण्यात आले आहेत. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार हे चार रस्ते बनवले आहेत. खुद्द महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी कामाची पाहणी केली होती. त्यामुळे जर खासगी वसाहतींमध्ये महापालिकेच्या खर्चाने रस्ते बनवण्याचे कोणतेही धोरण नसताना तसेच नगरसेवकांनी सुचवल्यानंतर अशाप्रकारच्या रस्त्यांची कामे केली जात नाहीत. मग गारोडियानगरमधील चार रस्ते निवडणुकीपूर्वी कुणाला मदत करण्यासाठी बनवले गेले असा आरोप प्रवीण छेडा यांनी प्रशासनावर केला आहे. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या सांगण्यावरून महापालिका आयुक्तांनी अशा प्रकारे त्यांना वैयक्तिक मदत केली आहे. त्यामुळ याची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रवीण छेडा यांनी केली आहे. याची गंभीर दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी याची त्वरीत चौकशी करून पुढील बैठकीत याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांना दिले आहेत.

Loading Comments