Advertisement

सिडको म्हाडावर भारी, 1 लाख 79 हजार 557 अर्ज सादर


सिडको म्हाडावर भारी, 1 लाख 79 हजार 557 अर्ज सादर
SHARES

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 9018 घरांसाठी केवळ 55 लाख अर्ज सादर झाले होते. त्यामुळे सिडकोच्या 14 हजार 838 घरांसाठी आता कसा प्रतिसाद मिळतो? हा प्रश्न होता. पण सिडकोने अखेर बाजी मारली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळावर सिडको भारी पडलं आहे. कारण सिडकोच्या घरांसाठी काही हजार नव्हे तर चक्क 1 लाख 79 हजार 557 अर्ज सादर झाले आहे.

2 लाखांचा आकडा सिडकोला पार करता आला नसला तरी हा आकडा खूप मोठा मानला जात आहे. हा प्रचंड प्रतिसाद पाहता आता 2 ऑक्टोबरला फुटणाऱ्या लॉटरीतील स्पर्धा चांगलीच वाढली आहे.


प्रतिसाद चांगला

घणसोली, तळोजा, द्रोणागिरी, कळंबोळी आणि खारघर मधील घरांसाठी 13 ऑगस्ट पासून नोंदणी सुरू झाली होती. ही नोंदणी शनिवारी, 15 सप्टेंबरला संपली असून 2 लाख 13 हजार 721 जणांनी नोंदणी केली आहे. नोंदणीला मिळालेला प्रतिसाद चांगला असतानाच अर्जविक्री आणि अर्जस्वीकृतीलाही अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.


अर्ज सादर करण्याची मुदत संपली

अर्जविक्रीची अर्थात अर्ज भरण्याची मुदतही शनिवारी, 15 सप्टेंबरला संपली आहे. त्यानुसार 2 लाख 27 हजार 145 अर्ज भरले गेले आहेत. तर अर्जस्वीकृतीची अर्थात अनामत रकमेसह अर्ज सादर करण्याची मुदत रविवारी, 16 सप्टेंबरला रात्री 12 वाजता संपली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सिडकोच्या 14 हजार 838 घरासाठी तब्बल 1 लाख 79 हजार 557 अर्ज सादर झाले आहेत. मुंबई लाइव्हला मिळालेल्या माहितीनुसार हा आकडा सोमवारी 17 सप्टेंबर, सकाळी साडे सात वाजेपर्यंतचा आहे. अंतिम आकडा येईपर्यंत यात जास्तीत जास्त एक हजाराची वाढ होऊ शकते.

आता या अर्जाची छाननी करत अर्जदारांची प्रारूप यादी 25 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजता प्रसिद्ध होणार आहे. तर अंतिम यादी 28 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानुसार लॉटरीत नेमकं किती अर्जदार सहभागी होणार आणि नशीब आजमवणार हे आता 28 सप्टेंबरलाच समजेल.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा