Advertisement

म्हाडाच्या मालवणीतील 'त्या' इमारती 'चकाचक'


म्हाडाच्या मालवणीतील 'त्या' इमारती 'चकाचक'
SHARES

म्हाडाच्या २०१५ च्या लाॅटरीमधील मालवणीतील २ इमारतीतील नव्याकोऱ्या घरांची कशी कचराकुंडी झाली आहे, या मुंबई लाइव्हच्या सोमवारच्या वृत्ताने म्हाडात चांगलीच खळबळ उडाली. या वृत्ताची गंभीर दखल घेत म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी म्हाडा अधिकाऱ्यांना 'स्वच्छते'च्या कामाला लावलं आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळपासून २० ते २५ जणांच्या टीमकडून या इमारतींच्या साफसफाई मोहिमेला सुरूवात करण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मालवणीतील २२४ घरांची लाॅटरी काढून २ वर्षे झाली तरी ओसी नसल्याने या घरांचा ताबा विजेत्यांना मिळालेला नव्हता. मात्र, त्याचवेळी काही विजेत्यांकडून नियम धाब्यावर ठेवत ओसी नसतानाही मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घराची रक्कम वसूल करून घेतली होती. आता २ वर्षानंतर ओसीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर मुंबई मंडळाच्या दुर्लक्षामुळे नवकोऱ्या इमारतींची दुरवस्था झाल्याचं उघड झालं. 



दुरूस्तीचीही मागणी

या इमारती, त्यातील घरे राहण्याजोगी नसल्याने या घरांचा ताबा घ्यायचा कसा? असं म्हणत विजेत्यांनी ही घरे ताब्यात घेण्यास तूर्तास नकार दिला आहे.  तर इमारतींची, घरांची दुरूस्ती करून देण्याची मागणीही 'मुंबई लाइव्ह'च्या माध्यमातून उचलून धरली. त्यानुसार आता मुंबई मंडळाने या इमारतींच्या प्रश्न लक्ष घालत इमारतींच्या साफसफाईसह डागडुजीला सुरूवात केली आहे.


लवकरच डागडुजी

इमारतीच्या आसपासचा कचरा महापालिकेच्या माध्यमातून उचलण्यास सुरूवात झाली आहे. तर सुरक्षा रक्षकांचा ताफाही वाढवण्यात आला आहे, जेणेकरून गर्दुल्ले इमारतीत घुसखोरी करणार नाहीत. त्याचवेळी इमारतीची, घरांची आवश्यक ती डागडुजी करत, रंगरंगोटी करत सर्व सोयी पुरवत येत्या काही दिवसांतच ही घरे राहण्याजोगी करत विजेत्यांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. तर विजेत्यांनी 'मुंबई लाइव्ह'चे विशेष आभार मानले आहेत.



हेही वाचा -

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज सादर करण्यास २ दिवस मुदतवाढ


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा